अनेकवेळा दोन प्राण्यांना लढतांना तुम्ही पाहिले असेल किंवा याबाबत ऐकले तरी असेल. परंतु, तुम्ही कधी दोन कासवांच्या लढईविषयी वाचले अथवा ऐकले आहे का? कदाचित नाही असेच उत्तर असेल. दक्षिण आफ्रिकेतील दजुमा प्रायव्हेट गेम रिझर्व्हमधील कासवांच्या लढाईचा एक व्हिडिओ समोर आला आहे. दोन नर कासवं उंच गवतात एकमेकांशी लढताना या व्हिडिओमध्ये नजरेस पडतात. दोघेही एकमेकांना ढकलताना पाहायला मिळतात. यातील आक्रमक कासव अन्य कासवाला ढकलत ढकलत बाजूला नेताना दिसतो. प्रसंगी ते त्याच्या पायाला चावादेखील घेते. प्रतिस्पर्ध्याच्या हल्ल्याने बेजार झालेले कासव शरणांगती पत्करत आपले डोके कवचाच्या आत लपवून घेते. कासवांचे हे युद्ध सफारी लाइव्हच्या टीमने कॅमेऱ्यात कैद केले आहे. आत्तापर्यंत ८१ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
‘डेली मेल’मधील वृत्तानुसार सोशल मीडियावर व्हिडिओ प्रसिद्ध होताच कासवांची लढाई आणि आक्रमकतेविषयी लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. आपल्या शांत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या कासवाचे अशाप्रकारचे वर्तन ही एक असामान्य घटना आहे. नर कासवांमध्ये क्षेत्रिय संघर्ष होतो आणि जिंकण्यासाठी ते चतुर रणनितीचा अवलंब करतात.
जनावरांचे शिकारीचे आणि लढाईचे अनेक व्हिडिओ अनेकवेळा समोर येतात. एक सिंह रानरेड्याची शिकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ अलीकडेच समोर आला होता. परंतु, ही शिकार त्याला खूप महागात पडली. सिंह शिकारीवर हल्ला करून रेड्याचे तोंड आपल्या जबड्यात दाबून धरतो. जीव वाचविण्यासाठी रेडा सतत आपली मान सोडविण्याचा प्रयत्न करतो. दोघांमध्ये रक्तरंजित चढाओढ सुरू होते. रेडा आपल्या खुरांनी आणि शिंगांनी सिंहावर हल्ला करतो. रेड्याच्या हल्ल्यात सिंह घायाळ होतो. यानंतर रानरेड्यांच्या झुंडातून अन्य एक रेडा सिंहावर हल्ला करतो. माघार घेत सिंह जमिनीवर बसतो. रानरेड्यांचा झुंड सिंहाला ठार मारतो किंवा तसाच सोडून देतो हे समजू शकले नाही.
व्हिडिओ