अनेक नेत्यांच्या त्यातही खास करुन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करणारा आणि प्रेक्षकांना खळखळून हसवणारा नकलाकार श्याम रंगीला पुन्हा चर्चेत आहे. यंदा तो चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची केलेली मिमिक्री. शनिवारी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने शनिवारी ऑलिम्पिकमध्ये इतिहास घडवला. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८७.५८ मीटर अंतरावर फेकलेल्या भाल्याने इतिहास घडवला आणि १०० वर्षांचा ट्रॅक आणि फिल्ड गेम्समधील भारताचा दुष्काळ संपला. १३ वर्षानंतर एखाद्या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं. या विजयानंतर पंतप्रधान मोदींनी नीरजशी फोनवरुन संवाद साधला. हा व्हिडीओ प्रंचड व्हायरल झाल्यानंतर आता शा्याम रंगीलाने त्याच्या पद्धतीने हा संवाद रेकॉर्ड करुन आपल्या युट्यूब चॅनेलवरुन पोस्ट केलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चेचा विषय ठरतोय.
नक्की वाचा >> नीरज चोप्राचं पंतप्रधान मोदींबद्दलचं दोन वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट झालं व्हायरल; म्हणाला होता, “ऐतिहासिक…”
या व्हायरल व्हिडीओमध्ये मूळ व्हिडीओत ज्याप्रमाणे पंतप्रधान मोदी तोंडाजवळ फोन ठेऊन नीरजशी बोलतात त्याचप्रमाणे श्याम मोदींच्या आवाजात नीरजशी संवाद साधत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन मिनिटांच्या व्हिडीओमध्ये मोदी म्हणून संवाद साधणाऱ्या श्यामनेच बराच वेळ एकाच बाजूने संवाद सुरु ठेवल्याचं दिसत आहे. समोरुन नीरज काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करतो मात्र इकडून श्याम मोदींच्या आवाजामध्ये न थांबता बोलताना दिसतो. एक दोन जागी समोर नीरजची भूमिका साकारणारा (केवळ आवाजातून) नट काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण श्याम बोलतच सुटतो. विशेष म्हणजे हा उपरोधिक टोला लगावताना संवादही तसेच वापरण्यात आलेत. आज तुमचा दिवस आहे, तुम्हीच बोलणार. आम्ही काय बोलणार, असं श्याम मोदींच्या आवाजात म्हणतो. त्यावेळी समोरचा नट, “मला असं म्हणायचं आहे की…” आणि वाक्य पूर्ण होण्याच्या आतच श्याम पुन्हा एकदा मोदींच्या खास शैलीत नीरजला तू खरा विजेता असल्याचं सांगतो पण त्याला बोलूच देत नाही.
नक्की वाचा >> DJ, चुरमा अन्… गोल्डन बॉय नीरज चोप्राच्या स्वागतासाठी गावकऱ्यांचा स्पेशल प्लॅन; आईनेच दिली माहिती
अखेर व्हिडीओच्या शेवटी मोदींच्या आवाजात चर्चा करणारा श्याम समोरच्याला बोलायला संधी देतो आणि तेव्हा शेवटच्या १० सेकंदांमध्ये समोर नीरजची भूमिका साकारणारा नट, “मी जेवढ्या दूर फेकलाय ना भाला, तर ती फेकण्याची प्रेरणा मला तुमच्याकडूनच मिळालीय,” असं वाक्य म्हणतो. त्यानंतर श्याम मोदींच्याच आवाजात, “खूप खूप आभार, तुम्ही एकदा भारतात या मग बघूयात,” असं म्हणत फोन कट करतो.
नक्की वाचा >> ४ लाख ३५ हजारांचे ४ भाले अन् एकूण खर्च… नीरजच्या प्रशिक्षणासाठी मोदी सरकारने किती खर्च केला माहितीये?
नक्की वाचा >> आनंद महिंद्रांपाठोपाठ भारतीय लष्कराकडूनही सुभेदार नीजरला मिळणार मोठं सप्राइज?
पंतप्रधान नरेंद्र मोदींची हुबेहूब नक्कल केल्याने श्याम प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या कलेची आणि प्रतिभेची जाण ठेवतच ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मध्ये त्याला ऑडीशन न घेताच प्रवेश देण्यात आला. कार्यक्रमातील त्याच्या सादरीकरणाचा व्हिडिओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि सर्वांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. मात्र, मोदींची नक्कल केल्याने काही लोकांकडून विरोध होणार या भितीने वाहिनीने आपल्यासोबत अन्याय केल्याचा आरोप श्याम रंगीलाने केला होता. मात्र त्यानंतर श्याम आता युट्यूबवरुन मोदींच्या आवाजातील वेगवेगळ्या विषयांवरील व्हिडीओ पोस्ट करुन चाहत्यांचं मनोरंजन करत असतो.