लाखो लोकांची स्वप्न नगरी असलेलं शहर म्हणजे मुंबई. सर्वाधिक वर्दळ, गर्दी, धावपळ असलेल्या या शहरातील लोकांची सर्वाधिक सोयीची वाहतूक व्यवस्था म्हणजे लोकल. लोकल ही मुंबईची जीववाहिनी आहे. मुंबई लोकलच्या या जीवनवाहिनीमधून एकावेळी हजारो लोक प्रवास करतात. कल्याण, डोंबिवली, वसई, विरारला मुंबईशी अवघ्या तासाभराच्या अंतरात जोडण्यासाठी ही लोकल प्रसिद्ध आहे. कारण, रस्तेमार्गे हा प्रवास तीन ते चार तासांचा होण्याची शक्यता आहे. माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनलेली ही लोकल प्राण्यांसाठीही तितकीच सोयीची झाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओनुसार, एक कुत्रा रोज लोकलने प्रवास करतोय.
गेल्या काही दिवसांत मुंबईत लोकल प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. पिक अवर्सच्या वेळेत लोकल पकडणे म्हणजे जिकरीचं काम झालंय. आज मी लोकल कशी पकडली यावरून नेहमीच्या लंचमध्ये मुंबईकरांच्या गप्पा रंगतात. मुंबईच्या लोकलमध्ये अनेक गंमती-जंमतीही घडतच असतात. कधीकधी प्राणी, पक्षी लोकलमध्ये शिरतात आणि प्रवाशांची एकच तारांबळ उडते. पण, असेही काही प्राणी आहेत, जे नियमित लोकलने प्रवास करतात. तुम्हाला हे खोटं वाटेल पण अंधेरी ते बोरिवली असा नियमित प्रवास करणाऱ्या एका कुत्र्याचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
इंस्टाग्रामवर इंडिया कल्चरल हब या पेजने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये एक भटका कुत्रा ट्रेनमध्ये शिरताना दिसतो. नेहमीचा प्रवासी असल्यासारखा तो वावरतो. या व्हिडिओमध्ये तो कुत्रा बोरिवली ते अंधेरी स्टेशनपर्यंतचा प्रवास करतोय असं सांगण्यात आलं आहे. ट्रेनमध्ये शिरला की, तो शांतपणे बसून राहतो. कोणालाही त्रास देत नाही. व्हिडीओतील दृश्यानुसार, लोकलमध्ये गर्दी नाहीय. म्हणजेच, हा कुत्रा दुपारच्या वेळेस प्रवास करत असण्याची शक्यता आहे. म्हणजेच दुपारच्या वेळेस तो बोरिवलीहून अंधेरीला जातो आणि पुन्हा रात्री अंधेरी ते बोरिवली असा प्रवास करतो.
या व्हिडीओच्या खाली आलेल्या कॉमेंटनुसार, अनेक प्रवासी त्याला ओळखतात. त्याचा हा प्रवास अनेकांनी पाहिला आहे. काहींना या कुत्र्याला भेटायची इच्छा व्यक्त केली आहे. तर, ज्यांनी या कुत्र्याला नियमित प्रवासात पाहिलं आहे, त्यांनी या कुत्र्याचं कौतुक केलं आहे.