मार्शल आर्ट्सचा सराव करतानाचा इंडो तिबेटीयन पोलिस दलाच्या (आयटीबीपी) जवानांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आयटीबीपीचे जवान बर्फामध्ये मार्शल आर्ट्सचा सराव करत आहेत. सोशल मीडियावर भारतीय जवानांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे. हा व्हिडीओ उत्तराखंडमधील आयटीबीपीच्या एका ट्रेनिंग इंस्टीट्यूटचा आहे. हे ट्रेनिंग इंस्टीट्यूट ११ हजार फूट उंचावर बर्फामध्ये आहे.

आयटीबीपीचे हे ट्रेनिंग उत्तराखंडमधील औलीमध्ये आहे. येथे जवानांना खास मार्शल आर्ट्सचे ट्रेनिंग दिलं जातं. ११ हजार फूटांवर कडाक्याच्या थंडीमध्ये जवान मार्शल आर्ट्सचे धडे घेत आहेत. मार्शल आर्ट्ससोबत जवानांना चिनी भाषा शिकवली जातेय. या ट्रेनिंग इंस्टीट्यूटमधून १९२५० जवानांना आतापर्यंत ट्रेनिंग दिली आहे.

बर्फामध्ये दिवसोंदिवस राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. येथे निवड होण्याआधी जवानांना बेसिक स्किल्स, शारीरिक आणि सकारात्मक मानसिकता अवगत करण्याचे ट्रेनिंग दिलं जातं. हा व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने पोस्ट केला आहे. त्यावर नेटीझन्स भारतीय जवानांची स्तुती करत आहेत.

Story img Loader