कुत्रा किंवा अन्य पाळीव प्राण्याला मोठ्या प्रेमाने घरी आणणे आणि नकोसे झाल्यावर त्यांना रस्त्यावर सोडून देणाऱ्यांची मानसिकता अनाकलनीय आहे. एकेकाळी घराचा आसरा असणारा आणि नंतर रस्त्यावर सोडून देण्यात आलेल्या पाळीव कुत्र्याची ती बिकट अवस्था पाहणे अतिशय क्लेशदायक असते. असे कृत्य करणाऱ्या त्या व्यक्तीसाठी जरी हा सोपा मार्ग असला, तरी त्या श्वानाच्या वेदना शब्दांत व्यक्त होऊ शकत नाहीत. कुत्रा हा अतिशय जीव लावणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. असाच एक भावनाविवश करणारा व्हिडिओ इथे शेअर केला आहे. या मागची घटना अशी… पायाला दुखापत झालेली कुत्री एका तरुणीला रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळून येते. खाण्यापिण्याच्या शोधात ती बाजारात फिरत असते. ही घटना स्पेन देशात घडली आहे. तिची अवस्था पाहून मालकाने तिला वाऱ्यावर सोडून दिल्याचे त्या तरुणीच्या लक्षात येते. त्या कुत्रीचे ‘वेरा’ असे नामकरण करण्यात येते. वेराच्या दुखऱ्या पायावर उपचार करण्यासाठी तरुणी तिला जवळच्याच रुग्णालयात घेऊन जाते. वेराला दुध येत असल्याचे तिच्यावरील उपचारादरम्यान डॉक्टरांच्या लक्षात येते. नजिकच्या काळात तिने पिलांना जन्म दिल्याचा तो संकेत असतो. वेराच्या पिलांना वाचविण्याचा निर्धार ती तरुणी करते. परंतु पिलांचा शोध कसा घ्यावा ही समस्या तिच्या समोर उभी राहाते. वेराची पिलं आसपास कुठे असतील अथवा त्यांना कोणी नेले असेल याविषयीदेखील ती अनभिज्ञ असते. अखेरीस वेराचा दुखरा पाय बरा होऊन ती काहीशी व्यवस्थित चालायला लागल्यावर तिच्यासोबत जाऊन पिलांचा शोध घेण्याचे ती ठरते. ज्याचा शेवटदेखील आनंददायी असाच होतो.

dog-01
(Photo: Facebook/Clinivet Turre Clinica Veterinaria)

वेरा पहिल्यांदा जेथे सापडली त्याच जागेवर ती तरुणी वेराला पुन्हा घेऊन जाते. वेरा एका अनोळखी मार्गावरून मार्गक्रमण करण्यास सुरुवात करते. आपल्या पिलांच्या विरहात दुःखी झालेली वेरा जवळजवळ तीन किलोमीटरपेक्षा अधिकचा प्रवास केल्यानंतर एका धूळ खात पडलेल्या कारजवळ येऊन थांबते. वेराच्या पाठोपाठ ती तरुणी कारच्या आत शिरताच आश्चर्यचकीत करणारे दृश्य समोर येते. १० छोटीछोटी गोंडस पिलं आपल्या आईची वाट पाहात त्या गाडीत बसल्याचे तिला आढळून येते.

dog-02
(Photo: Facebook/Clinivet Turre Clinica Veterinaria)

आपल्या काळजाच्या तुकड्यांपर्यंत घेऊन जाणाऱ्या या आईचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच भावनिक करेल. वेरा आणि तिची गोंडस पिलं एकमेकांसोबत आनंदात असून, सध्या वेरावर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासाठी योग्य आणि प्रेमळ घराचा शोधदेखील सुरू आहे.

dog-03
(Photo: Facebook/Clinivet Turre Clinica Veterinaria)

व्हिडिओ:

Story img Loader