समर्थ रामदास स्वामी यांनी म्हंटले आहे की,”केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, यत्न तोचि देव जाणावा. प्रयत्न करा, कार्य करा, यश तुम्हाला नक्की मिळेल. अनेकदा लोकांची परिस्थिती वाईट असते तरीही काही लोक हार मानत नाही. कितीही गरिबी असली तरी प्रमाणिकपणे प्रयत्न करत राहतात. कोणालाही सहजा सहजी काही मिळत नाही. कोणतीही गोष्ट मिळवण्यासाठी आधी प्रयत्न करावे लागतात, प्रयत्न करत राहिले की एक दिवस यश नक्की मिळते. ही शिकवण मुंबईतील योगेश सर्वांना देत आहे. एका भाजी विक्रेत्याचा मुलगा सीए झाल्यानंतर जेव्हा आपल्या आईला भेटला तेव्ह दोघांनाही अश्रू अनावर झाले आहे. योगेशचा आणि त्याच्या आईचा भावनिक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
११ जुलै २०२४ रोजी, भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) CA फायनल आणि इंटरमीडिएट परीक्षांचे निकाल जाहीर केले. मे महिन्याच्या परीक्षांचे आतुरतेने वाट पाहणारे निकाल उघड झाले आहेत. दरम्यान एका भाजीविक्रेत्याचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर आनंदात रडतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ठाण्यातील डोंबिवली (पूर्व) येथील एका भाजी विक्रेत्याचा मुलगा योगेश याने नुकताच सीएची परीक्षा उतीर्ण केली.
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री रवींद्र चव्हाण यांनी X वर व्हिडिओ शेअर केला. “योगेश, तुझा अभिमान आहे. डोंबिवली पूर्वेतील गांधीनगर येथील गिरनार मिठाई दुकानाजवळ भाजी विकणारे ठोंबरे मावशी यांचा मुलगा योगेश चार्टर्ड अकाउंटंट (सीए) झाला आहे. बळ, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर योगेशने खडतर परिस्थितीतही हे शानदार यश मिळवले आहे. त्याच्या यशाबद्दल त्याच्या आईचे आनंदाश्रू लाखमोलाचे आहेत. सीए सारखी खडतर परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या योगेशचे फारसे कौतुक करावे तेवढे कमी आहे. एक डोंबिवलीकर म्हणून मला योगेशच्या यशाबद्दल आनंद आहे. अभिनंदन योगेश! तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!”
व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत ३ लाखांपेश्रा जास्त लोकांना पाहिला आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. “अतिशय भावनिक क्षण. असे एकाने लिहिले. दुसरा म्हणाला, “अभिनंदन योगेश, तुझ्या यशासाठी तुझ्या आईने खूप त्याग केला असेल.”
हेही वाचा – डोंगराळ भागातून पाण्यासारखे वाहत आहेत दगड! भूस्खलनाचे थरारक दृश्य शांतपणे पाहतोय हा व्यक्ती, Video Viral
“योगेश, खूप खूप अभिनंदन आणि मेहनत करत राहा आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये यश मिळवा. तुमच्या आईची आणि कुटुंबाची नेहमी काळजी घ्या!” तिसऱ्या वापरकर्त्याने प्रतिक्रिया दिली.