Sudha Murthy at Mahakumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात देशभरातली भक्तांचा मेळा जमला आहे. विविध क्षेत्रातील नागरीक येथे भक्तीभावाने स्नान करत आहेत. काहीजण येथे येणार्या भक्तांची सेवा करत आहेत. समाजसुधारक आणि प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी या महाकुंभमेळ्यात हजेरी लावून भक्तांना प्रसाद वाटला. प्रसादाचं वाटप करतानाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हिरवी साडी आणि खांद्यावर काळी बॅग आणि केसांत पिवळ्या फुलांचा गजरा घालून अत्यंत साध्यापद्धतीने त्या भक्तांशी संवाद साधत आहेत.
सुधी मूर्ती या प्रसादाच्या काऊंटवर उभ्या राहून त्या भक्तांना चपाता वाटताना दिसत आहेत. तसंच, दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्या इस्कॉन महाप्रसादम किचनमध्ये फेरफटका मारतानाही दिसत आहेत. येथे त्यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला असून येथे मशिनद्वारे अन्न कसे तयार होते, हे समजून घेण्याचाही प्रयत्न केलाय.
अदानी समूह इस्कॉनच्या सहकार्याने महाकुंभमेळा परिसरात दररोज ४० हजारांहून अधिक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करत आहे. इस्कॉनने प्रयागराजच्या सेक्टर १९ मध्ये तयार केलेल्या स्वयंपाकघरात महाप्रसाद तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
महाप्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्वयंपाकघर पाणी गरम करण्यासाठी आणि भाजी-तांदूळ उकळण्यासाठी बॉयलरसारख्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. जड अन्न कंटेनर वाहून नेण्यासाठी ट्रॅक टाकण्यात आले आहेत. रोट्या बनवण्यासाठी तीन मोठी यंत्रे बसवण्यात आली आहेत. ही यंत्रे मिळून एका तासात १० हजार रोट्या तयार करतात.
महाकुंभ मेळ्यात सहभागी झाल्यानंतर सुधा मूर्ती काय म्हणाल्या?
या महाकुंभ मेळ्यात सुधा मूर्ती सोमवारी सहभागी झाल्या. त्या म्हणाल्या, “मी आनंदी, उत्साही आणि आशावादी आहे. सुधा मूर्ती यांनी पहिल्या दोन दिवसांत संगमात पवित्र स्नान केले. त्या एएनआयशी बोलताना म्हणाल्या, माझे आजोबा, आजी, यापैकी येथे कोणीही येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाने मला येथे तर्पण करावे लागले. मला खूप आनंद झाला आहे.”