Shocking Video : तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असाल, तर तुम्ही पाहिलं असेल की, रोज अनेक अनोळखी लोक बिल्डिंगमध्ये विविध कामांनिमित्त येत असतात. मात्र, अशा लोकांशी बोलताना जरा सावधान, कारण- पुण्यातील म्हाळुंगे पाडाळे या ठिकाणाच्या एका बिल्डिंगमध्ये एका वृद्ध महिलेबरोबर अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरलदेखील होतोय, जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. दरम्यान, या व्हिडीओसह नेमकी घटना काय घडली याविषयीदेखील माहिती देण्यात आली आहे.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये नमूद केल्याप्रमाणे घटना अशी आहे की, पुण्यातील म्हाळुंगे पाडाळे गावातील एका बिल्डिंगमध्ये एक वयोवृद्ध महिला एका अनोळखी तरुणीबरोबर गप्पा मारत लिफ्टमधून चौथ्या मजल्यावर जात होती. चौथा मजला येताच वयोवृद्ध महिला लिफ्टमधून बाहेर पडली आणि ती दार उघडून, तिच्या फ्लॅटमध्ये गेली. यावेळी ती अनोळखी तरुणीदेखील वयोवृद्ध महिलेला एकटं पाहून तिच्या मागोमाग गेली आणि तिनं वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला केला.
वृद्धेचे डोके टॉयलेट सीटच्या भांड्यात कोंबले आणि….
चोरीच्या उद्देशाने आलेल्या या तरुणीने घरात शिरताच तिने ओढणीच्या साह्याने वृद्ध महिलेचा गळा आवळून तिचे दागिने काढून घेतले. त्यानंतर तिने धमकावत महिलेकडून आणखी दागिने आणि पैशांची मागणी केली. यावेळी वयोवृद्ध महिला तिला प्रतिकार करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्या तरुणीने तिला ओढत टॉयलेट सीटपर्यंत नेले. धक्कादायक बाब म्हणजे त्यानंतर वृद्धेचे डोके टॉयलेट सीटच्या भांड्यात कोंबले आणि वरून पाणी सोडले; जेणेकरून गुदमरून त्या महिलेचा जीव जाईल. पण, वृद्धेने जीव वाचवण्यासाठी ताकद लावून आपले डोके फिरवले आणि त्या चोर महिलेकडे याचना केली की, मला मारू नकोस, तुला मी कानातले आणि इतर सगळे सोने, पैसा देते; पण मला सोड.
यावेळी वृद्ध महिला कानातील कुड्या काढण्याचा प्रयत्न करताना तिला फ्लॅटची काचेची खिडकी दिसली. अखेर जीव वाचवण्यासाठी म्हणून तिने शेवटी डायरेक्ट खिडकीवरून उडी मारली आणि ती जोरात ओरडली की, मला वाचवा.
हा सर्व प्रकार घडत समोरच्या फ्लॅटमधील गॅलरीत उभ्या असलेल्या एका महिलेने पाहिला आणि तिने तिच्या मुलांना तत्काळ याची माहिती दिली. अखेर दोन तरुण काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दार तोडून वृद्ध महिलेचा जीव वाचवला. तसेच चोरीच्या उद्देशाने आलेल्या महिलेलाही रंगेहाथ पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पण, अशा प्रकारची घटना तुमच्याबरोबरही घडू शकते. त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलणं टाळा, अशा लोकांना आपल्या घराविषयी, कुटुंबाविषयीची माहिती शेअर करू नका. कारण- कोण कोणत्या उद्देशाने तुमच्या घरात शिरेल ते काही सांगता येत नाही.