सध्या सगळीकडेच व्हायरलची साथ पसरली आहे. आपण चित्रीत केलेला व्हिडीओ व्हायरल व्हावा म्हणून कोणी काय करेल, याचा अंदाज बांधणे कठीण आहे. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी एका व्यक्तीने चक्क त्याचा आयफोन जगातील सर्वात उंच इमारतीवरुन खाली फेकला आहे. दुबईतील बुर्ज खलिफा इमारतीवरुन आयफोन फेकून देत असतानाचा व्हिडीओ या व्यक्तीने सोशल मिडीयावर शेअर केला आहे.
विशेष म्हणजे या व्यक्तीने बुर्ज खलिफाच्या १४८ व्या मजल्यावरुन खाली फेकलेला फोन हा आयफोन ७ प्लस आहे. काही दिवसांपूर्वीच ऍपलकडून लाँच करण्यात आलेला हा फोन विकत घेण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र किंमत अतिशय जास्त असल्याने या फोनसाठी किडनी विकावी लागेल, असे विनोद केले जात आहेत. मात्र फक्त आणि फक्त सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी एका व्यक्तीने हा महागडा फोन बुर्ज खलिफावरुन फेकून दिला.
टेकरॅक्स नावाच्या युट्यूब चॅनेलकडून अनेक महागड्या उपकरणांना उद्ध्वस्त करुन त्यांचे व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल केले जातात. याच टेकरॅक्स ग्रुपकडून हा नवा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच आयफोन ७ प्लस किती उंचावरुन फेकला जाणार आहे, याची कल्पना येते. १४८ व्या मजल्यावरुन कोणताही फोन फेकला गेला तरी त्याचे काय होणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा आयफोन ७ नंतर ट्रॅकदेखील करणे शक्य झाले नाही.
आयफोन ७ विकत घेण्याची अनेकांची इच्छा आहे. मात्र या फोनची किंमत जास्त असल्याने अनेकांची ही इच्छा पूर्ण होणे तसे कठीणच आहे. मात्र या व्हिडीओमधील व्यक्ती अगदी आरामात हा फोन खाली फेकून देताना दिसते आहे. हा व्हिडीओ पाहताना अनेक आयफोनप्रेमींच्या हृदयाचे ठोके चुकले. सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल करण्यासाठी कोणी काय करेल, हे कोणीही सांगू शकत नाही, हे या व्हिडीओने दाखवून दिले आहे.