वेगवेगळ्या वंशांच्या लोकांना हिंदी बोलताना ऐकणं आणि पाहणं ही एक पर्वणी असते. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असो किंवा सध्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे असणारे डोनाल्ड ट्रम्प, त्यांनी हिंदी बोलण्याचा केलेले प्रयत्न धमाल उडवून देतो. असं असताना एक कोरियन मुलगी जेव्हा लाल रंगाची साडी नेसून हिंदी बोलण्याचा आणि भारतीय पध्दतीने नृत्य करण्याचा (खरंतर ते नृत्य भारतीय नृत्यापेक्षा अरेबियनच अधिक वाटतं) प्रयत्न करते तेव्हा फक्त चेह-यावर हास्य उमटत नाही तर डोळ्यात पाणी येईपर्यंत आपण हसत राहतो.
कोरियाच्या प्रसिध्द ‘हाय किक ३’ या सिच्युएशन कॉमेडी सिरीयलच्या व्हिडिओतील ही क्लिप असून यामध्ये दोन कोरियन मुली पोलिस ठाण्यामध्ये असतानाचा प्रसंग चित्रित केलेला आहे. सू जॉन्ग आणि जी वॉन या दोन मुली ज्या अनुक्रमे अमेरिकन आणि भारतीय मुलीची भूमिका यामध्ये वठवताना दिसतात. खरंतर २०१२ सालीच हा एपिसोड प्रदर्शित झाला असून आता अचानक ही क्लिप व्हायरल झाली आहे.
गाडी चालवताना चुकीचे वळण घेतल्याबद्दल या दोन मुलींना पकडून पोलिस ठाण्यात नेले जाते. तिथे त्या आपली खरी ओळख लपवण्याचा प्रयत्न करतात. पण खरी धमाल तेव्हा येते जेव्हा त्यातली एक मुलगी आपली खरी ओळख लपवण्यासाठी तिला येत असलेला एकमेव हिंदी संवाद सतत बोलण्याचा प्रयत्न करते. आणि ती ऐतिहासिक ओळ म्हणजे: ‘मेरे से शादी करोगे? मैं खूबसूरत हूँ’ (माझ्यासोबत लग्न करशील? मी सुंदर आहे.) या व्हिडिओला फेसबुकवर आत्तापर्यंत ११, १३९ शेअर्स झाल्याचे दिसत आहे.