युक्रेनमधील एका अनोखळी वृद्ध महिलेचा व्हिडीओ सध्या जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरतोय. ही महिला युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियन लष्करामधील एका जवानाला झापताना दिसत आहे. मात्र आपलं बोलणं झाल्यानंतर ही महिला या सैनिकाच्या हातात सूर्यफुलाच्या बियांची छोटी पिशवी देताना दिसतेय. हा व्हिडीओ सध्या जगभरात चर्चेत असून अनेकांनी या शूर आजींचं कौतुक केलंय. हातामध्ये बंदूक असणाऱ्या सैनिकाला न घाबरता त्याच्या हातात सूर्यफुलाच्या बिया टेकवत या आजींनी, “तू या बिया सूर्यफुलाच्या बिया तुझ्या खिशात ठेवल्या पाहिजेत. म्हणजे तू जेव्हा मरशील तेव्हा युक्रेनच्या भूमीमध्ये या बिया उगवतील,” असं या आजींनी सांगितल्याचा दावा केला जातोय.
नक्की पाहा >> Photos: व्लादिमिर Vs वोलोडिमिर! युक्रेन युद्धात पुतिन यांना नडणारा ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’
ही महिला या सैनिकाच्या जवळ गेली आणि तिने त्याला “तू कोण आहेस?”, असा प्रश्न विचारला. त्यावर सैनिकाने, “इथे आमचं प्रशिक्षण सुरु आहे. तुम्ही कृपया इथून बाजूला व्हा,” असं उत्तर दिलं. त्यानंतर महिलेने, “तू रशियन आहेस का?”, अशी विचारणा केल्यावर “होय” असं उत्तर मिळालं. त्यावर “तू इथं काय करतोयस?” असं या सैनिकाला या आजीने विचारलं. “आता आपण ही चर्चा करुन काहीच साध्य होणार नाहीय,” असं तो सैनिक या महिलेला सांगतो.
नक्की वाचा >> Russia vs Ukraine War: रात्री उशीरा पंतप्रधान मोदींचा पुतिन यांना फोन; फोनवर म्हणाले, “रशियाचे…”
“तुम्ही घुसखोरी केलीय. तुम्ही फॅसिस्ट विचारसणीचे आहात. तुम्ही एवढ्या साऱ्या बंदुका घेऊन इथं काय करतायत? या बिया घे आणि तुझ्या खिशात ठेवं. त्यामुळे तुम्ही इथं मेल्यावर किमान या बिया तरी उगवतील,” असं या महिलेने सैनिकाला संतापून सांगितलं.
नक्की वाचा >> Ukraine War : “…तर ५ लाख किलो वजनाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन भारतावर पाडायचं का?”; रशियाची अमेरिकेला धमकी
या आजींचं हे रुप पाहून सैनिक गोंधळून गेला. मात्र आजीबाई बडबडत राहिल्या. “या क्षणापासून तू एक शापित आहेस, असं मी तुला सांगू इच्छिते,” असंही या आजींनी सैनिकाला सांगितलं. “तुम्ही वाद वाढवून तणाव निर्माण करु नका,” असा सल्ला या सैनिकाने आजींना दिल्यानंतर त्यावरुनही त्यांनी या सैनिकाला सुनावलं. “अजून काय तणाव वाढायचा बाकीय? तुम्ही इथे घुसखोरी केलीय,” असं आजींनी ऐकून दाखवलं.
रशियन सैन्याची आगेकूच सुरूच असून शुक्रवारी युक्रेनची राजधानी किव्हच्या उपनगरांवर क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले. त्याचबरोबर किव्हच्या वायव्येस असलेला मोक्याचा विमानतळ ताब्यात घेतल्याचा आणि या भागात पॅराशूटच्या साहाय्याने सैनिकांना (पॅराट्रुप्स) उतरवल्याचा दावा रशियन लष्कराने केला.
नक्की वाचा >> Ukraine War: रशिया दौऱ्यात इम्रान खान यांच्या कुरापती; युक्रेनवर हल्ला करणाऱ्या पुतिन यांना म्हणाले, “काश्मीर प्रश्न…”
काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या वृत्तानुसार रशियाने युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ला केला असून भीतीने नागरिकांनी भुयारी मेट्रो स्थानकांमध्ये आश्रय घेतला आहे, तर काही नागरिक पश्चिमात्य देशांमध्ये आश्रयाला जात आहेत. शुक्रवारी युक्रेनच्या पश्चिम सीमेवर शेकडो महिला आणि मुले शेजारच्या देशांमध्ये प्रवेश करण्यासाठी उभे असल्याचे आढळले. रशियाने मात्र किव्हवर हल्ला केल्याचे वृत्त फेटाळले आणि रशियन सैन्य नागरी भागांना लक्ष्य करणार नाही, असे स्पष्ट केले.