यंदाचा उन्हाळा फारच कडक आहे. या रणरणत्या उन्हात एक घोट गारगार पाण्याचा अमृताहूनही गोड वाटतो नाही का? या कडक उन्हात बाहेर फिरताना एखादी थंड पाण्याची बाटली विकत घेऊन आपण तहान भागवतो. अनेकांच्या बॅग, पर्समध्ये थंड पाण्याची बाटली असतेच, पण उन्हच एवढं असतं की बॅगमधलं पाणी कधीही गरम होतं. अशा वेळी भारतीयांसाठी खास मेक इन इंडिया मातीच्या बाटल्या एका देशी कंपनीने तयार केल्या आहेत .
आजही अनेक खेड्या पाड्यात फ्रिज पोहोचलेले नाही, तेव्हा तिथलं पाणी गार राहण्यासाठी मातीची मडकी म्हणजेच माठ वापरले जातात. माठात पाणी गार राहतं आणि त्याचबरोबर मातीची एक वेगळीच चव पाण्याला येते, ही कल्पना घेऊन ‘मिट्टी कूल’ कंपनीने खास मातीच्या बाटल्या बनवल्या आहेत. या बाटल्या अशा पद्धतीची माती वापरून बनवल्या आहेत की ज्यात अधिक काळापर्यंत पाणी थंड राहू शकतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी या बाटलीचा फोटो ट्विट करत शेअर केला आहे. या बाटल्या खास उन्हाळ्यासाठी तयार करण्यात आल्या असून यामुळे पाणी दीर्घ काळापर्यंत गार राहण्यास मदत होणार आहे. तेव्हा यापुढे भारतीयांना पाणी गार ठेवण्यासाठी महागड्या फॉरेन ब्रँडच्या बाटल्या खरेदी करण्याची गरज भासणार नाही. देशातल्या मातीपासून तेही हाताने तयार केलेल्या या स्टाइलिश बाटल्यामध्ये रणरणत्या उन्हात गार गार पाणी पिण्याची मज्जाच काही और असेल नाही का?