विमान प्रवास हा सर्वांत आरामदायी आणि सुरक्षित मानला जातो. त्यामुळे लोक अनेकदा विमानाने प्रवास करण्यास प्राधान्य देतात. त्यात अनेकांचे एकदा तरी विमानात बसण्याचे स्वप्न असते. पण, तुम्ही स्वप्नात पाहिलेला विमान प्रवास प्रत्यक्षात दु:स्वप्नात बदलला तर? नुकताच समोर आलेला व्हिडीओ पाहता, तुम्हाला असेच काहीसे दिसेल.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ एअर इंडियाच्या फ्लाइटचा आहे. त्यामध्ये प्रवासी बसले आहेत; पण वरच्या छतावरून खाली पाणी टपकत आहे. जुन्या ओसाड घरात जसे पाणी टपकत राहते त्याच प्रकारे या विमानाची स्थिती दिसत होती. प्रवासासाठी चांगले पैसे आकारणाऱ्या विमानातही असे काही घडू शकते हे पाहून प्रवासीही आश्चर्यचकित झाले आहेत.
@insiderscorner या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे; ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, दिल्ली ते लंडन गॅटविक विमानतळासाठी उड्डाण केल्यानंतर एअर इंडियाच्या बोईंग B787 ड्रीमलायनरच्या ओव्हरहेड स्टोरेजमधून अचानक पाणी गळू लागते. यावेळी केबिन क्रूने सक्रियतेने सर्व परिस्थिती हाताळली.
व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी अशा गोष्टी फ्लाइटमध्येही होतात, असा प्रश्न विचारत योग्य देखभालीअभावी अशा घटना घडताना दिसत आहेत, असे म्हटले आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे विमान अर्ध्या वाटेत असताना अशी घटना घडली; ज्यामुळे प्रवासीही घाबरले. मात्र, केबिन क्रूने वेळीच परिस्थिती हाताळल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याआधीही एअर इंडियामध्ये अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत; ज्यामध्ये प्रवासी एकमेकांशी वाद घालताना किंवा भांडताना दिसले होते.
अलीकडे एअर इंडियाच्या विमानांमध्ये अनेक घटना समोर आल्या आहेत; ज्यामध्ये प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. मात्र, आता ही नवी घटना उघडकीस आल्याने लोकांना धक्का बसला आहे. फ्लाइटच्या छतावरून पाणी गळत असल्याचा व्हिडीओ ज्या प्रकारे समोर आला आहे, तो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत.