Vande Bharat Viral Video : वंदे भारत ही प्रीमियम ट्रेन आहे. वंदे भारत एक्स्प्रेस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ही ट्रेन कधी गुरांवर आदळल्याने, तर कधी अन्य कारणांमुळे अशा प्रकारे नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा या ट्रेनची अशीच काहीशी चर्चा सुरू झाली आहे. पण, यावेळी समोर आलेली घटना अतिशय खळबळजनक आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली ही वंदे भारत ट्रेन पहिली सेमी हायस्पीड ट्रेन आहे. या ट्रेनमध्ये मिळणाऱ्या सुविधा अन् तिच्या वेगामुळे प्रवासी वंदे भारत ट्रेनला प्राधान्य देऊ लागले आहेत. या ट्रेनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आता पावसाळ्याच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. देशातील काही भागांत जोरदार पावसाचे आगमन झाले आहे. परंतु, आता जोरदार पावसाचे आगमन होताच दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या छतावरून पाणी टपकू लागले आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह. त्यानंतर युजर्सनी ट्रेनच्या अशा स्थितीमुळे प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला ट्रेनच्या छतावरून खूप पाणी गळत असल्याचं पाहायला मिळत आहे. फरशीही पाण्याने पूर्णपणे ओली झाली आहे. आसनांवरही पाणी टपकत असून, लोक ओल्या सीटवर बसले आहेत. अनेक जण ट्रेनमध्ये बसलेलेही दिसतात. साहजिकच अशा पाण्याच्या गळतीमुळे लोकांना त्रास होत आहे. प्रिया सिंहने हा व्हिडीओ तिच्या X च्या हॅण्डल @priyarajputlive वर शेअर केला आहे.

(हे ही वाचा : खेळता-खेळता काळाचा घाला; तडफडत होता तरी कळलं नाही अन् हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; हृदय हेलावून टाकणारी घटना व्हायरल )

हा व्हिडीओ शेअर करताना प्रियाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “वंदे भारत ट्रेनची स्थिती पाहा.” वंदे भारत क्रमांक २२४१६ ही ट्रेन दिल्ली-वाराणसी मार्गावर धावते. या व्हिडीओला आतापर्यंत २६ हजारांहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी कमेंट्सही केल्या आहेत.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने या व्हिडीओवर कमेंट करीत लिहिले, “पाइपमध्ये तात्पुरता अडथळा आल्याने डब्यात काही प्रमाणात पाणीगळती होत असल्याचे दिसले. ही बाब ट्रेनमध्ये उपस्थित कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली आणि ती दुरुस्त करण्यात आली. झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.”

येथे पाहा व्हिडीओ

एका युजरने लिहिले आहे, “अशा परिस्थितीत विजेचा धक्का बसण्याचा धोका आहे. सावधान.” आणखी एका युजरने लिहिले, “मेड इन इंडिया फक्त भारतीय लोकांसाठी.”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचे आहे? कृपया आपले मत मांडा.