हुंड्यामुळे लग्नं मोडल्याच्या असंख्य घटना आपण पाहिल्या आहेत. त्याचबरोबर अलीकडे एखाद्या क्षुल्लक कारणावरून लग्नं मोडल्याची प्रकरणंदेखील पाहायला मिळाली आहेत. कधी लग्नात आईसक्रीम, पनीर किंवा गुलाबजामूनवरून भांडण होऊन लग्न मोडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. असंच एक प्रकरण तेलंगणात पाहायला मिळालं आहे. परंतु, यावेळ मटणामुळे लग्न मोडलं आहे. मटणावरून वर पक्षातील मंडळींनी वाद घातला, हा वाद इतक्या विकोपाला गेला की लग्नच मोडलं आणि वऱ्हाड माघारी परतलं.
तेलंगणातल्या निजामाबाद येथे राहणाऱ्या तरुणीचं जगतियाल जिल्ह्यात राहणाऱ्या तरुणाशी लग्न ठरलं होतं. या लग्नात वधू पक्षाने वऱ्हाडासाठी मांसाहारी जेवणाची व्यवस्था केली होती. नवरदेव वऱ्हाड घेऊन नवरीच्या घराजवळ उभारलेल्या मांडवात आला. सुरुवातीला सर्वकाही सुरळीत चाललं होतं. लग्नात मांसाहारी जेवणाची व्यवस्था असल्याने वऱ्हाडानेही त्यावर ताव मारण्यास सुरुवात केली. दरम्यान, वऱ्हाडातल्या काही लोकांनी जेवणात मटणाची नळी मिळाली नाही म्हणून तक्रार करण्यात सुरुवात केली.
नवरदेवाकडच्या मंडळींनी तक्रार केली की त्यांना जेवणात मटणाची नळी मिळाली नाही. त्यामुळे दोन्ही बाजूच्या लोकांचं भांडण सुरू झालं. बघता बघता हे भांडण इतकं वाढलं की दोन्ही बाजूचे लोक थेट पोलीस ठाण्यात दाखल झाले. मटणाच्या नळीवरून सुरू झालेल्या या भांडणात पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वऱ्हाडाची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, नवरदेवाच्या नातेवाईकांनी तक्रार केली की “वधू पक्षाने आमच्या वऱ्हाडाला जेवणात मटणाची नळी न देऊन आमचा अपमान केला आहे.” तसेच त्यांनी पोलिसांनाही जुमानलं नाही.
हे ही वाचा >> Video: वाघानं घराच्या भिंतीवर मांडलं ठाण; काही केल्या उठेचना! शेवटी…
वधू पक्षाने यावर म्हटलं, आम्ही आधीच वर पक्षाला सांगितलं होतं की, जेवणात मटण असलं तरी त्यात नळ्या नसतील. शेवटी काही थोरामोठ्यांनी दोन्ही बाजूच्या लोकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यात कोणालाही यश मिळालं नाही अखेर मटणाच्या नळीवरून हे लग्न मोडलं. त्यानंतर नवरदेव वऱ्हाड घेऊन माघारी परतला.