Groom Video Viral: लग्न केवळ दोन व्यक्तींना नाही, तर दोन कुटुंबांना एकत्र आणतं. हा लग्नसोहळा खास व्हावा आणि सगळ्यांच्या तो लक्षात राहावा यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. लग्न प्रत्येकासाठीच खूप खास असतं. आपल्या आयुष्याचा जोडीदार आता पुढील वाटचालीत कायम आपल्याबरोबर असण्याची भावनाच काही और असते. लग्नसोहळ्यातील काही विशेष क्षण अनेकांच्या लक्षात राहतात.
मुलीचे आई-बाबा अगदी विधिवत सगळ्या गोष्टी पार पडतील की नाही याची काळजी घेत असतात. त्यात जावयासाठी ते अधिकच्या गोष्टीही करतात. अनेकदा लग्नात जावयाला सोन्याचा दागिना दिला जातो. जावईही त्या भेटवस्तूचा स्वीकार करतात. पण, सध्या अशा एका नवरदेवाचा सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात नवरदेव सासऱ्यांकडून भेटवस्तू स्वीकारायला नकार देतो.
…अन् नवरदेवाने दिला चेन घ्यायला नकार
सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या या व्हिडीओमध्ये भव्य लग्नसोहळा पार पडताना दिसतोय. स्टेजवर नववधू आणि वर उभे असताना सासरेबुवा नवरदेवाला चेन घेण्यासाठी आग्रह करताना दिसतायत; पण नवरदेव चेन घेण्यास नकार देतोय. तरी सासऱ्यांच्या आग्रहाकरिता नवरदेव अखेर चेन घालण्यास तयार होतो आणि मग सासरेच त्याच्या गळ्यात ती चेन घालतात.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @archana_gaonkar_photography या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘चेन घ्यायला नकार करणारा नवरा पहिल्यांदाच बघायला मिळाला’ अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्यावर तब्बल ४.५ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
नवरदेव आणि सासऱ्याच्या नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आताच्या जमान्यात मुलाची एवढीच अपेक्षा असते की, मुलगी व्यवस्थित संसार करू दे”. तर दुसऱ्याने, “एक नंबर भावा, मागणारे खूप पाहिले; पण आज नको म्हणणारा पहिला”, अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “ताई, यांना बापाच्या कष्टाची जाणीव आहे.” एकाने, “जरा अजून जास्त तोळ्याची पाहिजे असेल म्हणून नको म्हणत असेल”, अशीदेखील कमेंट केली.