रशिया-युक्रेन युद्धामुळे शेअर बाजारात घसरण आहे. आज शेअर बाजारात १४९१.०६ अंकांची घसरण होत ५२,८४२ अंकांवर बंद झाला. तर नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमध्ये ३८२.२० अंकांची घसरण झाली असून १५,८६३.१५ अंकांवर बंद झाला. दोन आठवड्यांपासून शेअर बाजारात घसरण सुरू असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे. या घसरणीचे प्रमुख कारण रशिया आणि युक्रेनमधील युद्ध असल्याचे सांगितले जात आहे. रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा खनिज तेल उत्पादक देश आहे. अशा परिस्थितीत रशिया युद्धात उतरल्यानंतर जगातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे, रशियाला जागतिक बाजारपेठेत ६५ टक्के तेल विकता येत नाही, त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती १२५ डॉलर प्रति बॅरल इतकं झालं आहे. किमती १४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. याशिवाय अॅल्युमिनियम, तांबे, स्टील आणि इतर धातूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे बाजाराच्या या घसरणीबाबत उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. या परिस्थितीला त्यांनी २१ व्या शतकातील जागतिक युद्ध म्हटले आहे.
आनंद महिंद्रा यांनी ट्विट केले की, “यात आश्चर्यका वाटण्यासारखं काहीच नाही कारण जग प्रभावीपणे युद्धात आहे. भौतिक लढाई एका देशात होऊ शकते. परंतु राजकीय, आर्थिक, सायबर, सोशल मीडिया आणि उपयुक्त संसाधने यांच्यातील युद्धरेषा आखल्या गेल्या असून त्या जागतिक आहेत. २१ व्या शतकातील जागतिक युद्धात आपले स्वागत आहे.”
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटला उत्तर देताना, प्रफुल नावाच्या एका ट्विटर वापरकर्त्याने म्हटलं आहे की, “आपली अर्थव्यवस्था आणि जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताला यावेळी शक्तिशाली भूमिका बजावावी लागेल. गेल्या दोन वर्षांत जग एका महामारीतून गेले आहे आणि आता आम्हाला हे युद्ध नको आहे” ज्यावर प्रत्युत्तर देताना त्यांनी लिहिले की, “मी सहमत आहे”.