प्राणी पाळायला अनेकांना आवडतात. आपल्या देशात कुत्रा, मांजर, गाय, बैल, शेळ्या, पोपट इत्यादी प्राणी-पक्षी मोठ्या प्रमाणावर पाळले जातात. परदेशात विविध प्राणी पळाले जातात. मात्र, यामध्ये काही असेही प्राणी असतात ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही. बऱ्याच देशांमध्ये सरडे, मगर, इतकंच नाही तर वाघ आणि सिंह यांच्यासारखेही प्राणी पाळले जातात. असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र, असे प्राणी पाळणे धोकादायकही ठरू शकते.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक तरुण सिंहांच्या पिल्लांना कुरवाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, जंगली प्राण्यांशी जवळीक साधणे किती धोकादायक ठरू शकते याची तुम्हाला खात्री पटेल. बासित अयान या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तो सिंहांच्या दोन पिल्लांच्या शेजारी उभा आहे. यावेळी तो पिल्लांच्या डोक्यावरून हात फिरवून त्यांना कुरवाळत आहे. मात्र पुढे जे झालं ते पाहून तुमचाही थरकाप उडेल.
या व्हिडीओमध्ये ही दोन पिल्लं कारच्या डिक्कीवर बसलेली आहे. शेजारचा तरुण त्यांच्या डोक्यावर शांतपणे हात फिरवत आहे. मात्र या दोन पिल्लांपैकी एका पिल्लाला राग येतो आणि तो या तरुणावर हल्ला करतो. यामुळे तरुण चांगलाच घाबरतो. पुढे काय झालं ते पाहुयात.
पिल्लाने हल्ला केल्यानंतर हा तरुण घाबरून बाजूला झाला. सुदैवाने पिल्लाचा हल्ला यशस्वी ठरला नाही. यानंतर ते पिल्लू उठून कारच्या छतावर जाण्याचा प्रयत्न करू लागले. पुन्हा एकदा तरुणाने पिल्लाला पकडण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओला आतापर्यंत २ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले असून तो ३० लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर नेटकऱ्यांनी या तरुणावर टीकास्त्र सोडले आहे. जंगली प्राणी हे कोणतेही खेळणे नाही, त्यामुळे त्याच्यापासून लांब राहण्याचा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. एका युजरने म्हटलंय, ‘हे काही पाळीव प्राणी नाहीत.’