पश्चिम बंगालमधील दुर्गा पूजेला विशेष महत्व असते. या राज्यामध्ये नवरात्री हा केवळ उत्सव नसून तो येथील संस्कृतीचा अविभाज्य भाग असल्याचे दिसून येते. त्यामुळेच पश्चिम बंगालमधील मुर्तीकारांनी घडवलेल्या मूर्तींना अगदी बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड आणि ओदिशापासून अनेक राज्यांमध्ये मागणी असते. बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक पद्धतीने नौरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण अधिक आहे. येथे अनेक लोकप्रिय मंडळे सामाजिक संदेश देणारा देखावा आपल्या मंडपांमध्ये साकारतात. अशाच प्रकारच्या एका मंडळाने यंदाच्या नौरात्रोत्सवात अगदीच वेगळा प्रयोग केला असून सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.

दक्षिण कोलकात्यामधील बेहाला येथील एखा दुर्गा पूजा समितीने यंदा आपल्या मंडळाच्या वतीने मंडपात दुर्गा मातेऐवजी एका स्थलांतरित मजूर असणाऱ्या महिलेची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या महिलेच्या कडेवर एक लहान मूल असल्याचे दाखवण्यात आलं आहे. पूजा समितीच्या संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार करोना लॉकडाउनच्या कालावधीमध्ये स्थलांतरित मजुरांना सोसाव्या लागणाऱ्या कष्टाचे आणि त्रासाचे प्रतिक म्हणून आम्ही ही मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही मूर्ती म्हणजे स्थलांतरित मजुरांचे केवळ दु:खच नाही तर त्यांची जिद्द आणि हिंमत याचेही प्रतिक आहे.

या मंडपामध्ये केवळ दुर्गा नाही तर इतर देवींच्या मूर्तीही यंदा बदलण्यात आल्यात. लक्ष्मी आणि सरस्वती देवीच्या ऐवजी स्थलांतरित मजूरांच्या मुलींच्या मुर्ती स्थापन करण्यात येतील. या मुलीपैकी एका मुलीच्या हातात घुबड आहे जे लक्ष्मीचे वाहन आहे. तर दुसरीच्या हातात बदक असून ते सरस्वती देवीचे वाहन आहे. या सर्वांबरोबर एक हत्तीचे मुंडके असणारा मुलगाही दाखवण्यात आला असून तो गणपतीचे प्रतिक आहे.

मंडपामधील स्थलांतरित मजूर महिला ही दुर्गा देवीकडे जाताना दाखवण्यात आली आहे. संकाटापासून आपल्याला सुटका मिळावी या आशेने ती देवीकडे जाताना दाखवण्यात आली आहे. या मंडळाची यंदाची थीमच सुटका अशी आहे. द टेलिग्राफला दिलेल्या मुलाखतीमध्ये या मूर्तीची मूर्तीकार रिंकू दास यांनी, “मी त्या महिलेलाच देवी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. ती कडक उन्हामध्ये आपल्या उपाशी मुलांना घेऊन चालत आहे. आपल्या मुलांसाठी ती अन्न पाणी आणि मदतीचा शोध घेताना दिसत आहे,” असं म्हटलं आहे.