पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी कृष्णनगर एमपी कप स्पर्धेत फुटबॉल खेळतानाचे त्यांचे फोटो सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोमधील विशेषता म्हणजे महुआ साडी नेसून फुटबॉल खेळताना दिसत आहेत. यामधील एका फोटोमध्ये तर त्या फुटबॉलला किक करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये त्या गोलपोस्टजवळ चेंडू पकडण्याचा प्रयत्न करत होत्या.

महुआ मोईत्रा यांनी आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “कृष्णनगर एमपी चषक स्पर्धेच्या २०२२ च्या अंतिम सामन्यातील काही मजेदार क्षण. आणि हो, मी साडी नेसून खेळते.” महुआ यांच्या या अंदाजामुळे मैदानावर उपस्थित असलेले लोक तर थक्क झाले आहेतच, पण सोशल मीडियावर नेटकरीही त्यांच्या या शैलीचे कौतुक करत आहेत. या फोटोमध्ये महुआ यांनी लाल-नारिंगी रंगाची साडी, गॉगल आणि शूज असा पेहराव केल्याचे आपण पाहू शकतो.

राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर कॅडबरीसह तब्बल ६०० कंपन्यांची चिंता वाढली; नेमकं कारण काय?

सोशल मीडियावर नेटकरी महुआ यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनीही महुआ यांच्या फोटोवर कमेंट केली आहे. त्यांनी लिहलंय, ‘कुल, मला तुमचा शॉट खूप आवडला.’ एका युजरने म्हटलंय, ‘खूप छान. हे प्रशंसनीय आहे.’ दुसऱ्या एका युजरने म्हटलं, ‘उत्साही महुआ मोईत्रा; संसदेत आणि मैदानातही.’

तथापि, याआधीही महुआ मोईत्रा यांना साडीमध्ये खेळताना पाहिलं गेलं आहे. यापूर्वी, तृणमूल काँग्रेसने १६ ऑगस्ट रोजी खेल होब डे साजरा केला आणि खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी पश्चिम बंगालमध्ये सामने आयोजित केले. यावेळचे फोटोही महुआ यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले होते.

Story img Loader