लॉकडाउनमध्ये शिथिलता आल्यानंतर लग्न मोठ्या धुमधडाक्यात केली जात आहेत. पाहुण्यांना खूश करण्यासाठी खाणपानाचं आयोजन केलं जात आहे. लग्नात जेवणाला नावं ठेवू नये, यासाठी खास आयोजन करण्यात येत आहे. चवीसोबत अन्न अपुरं पडू यासाठी काळजी घेतली जात असते. मात्र अनेकदा लग्नातील जेवण बऱ्याच प्रमाणात उरतं. अशात ते अन्न फेकलं जातं किंवा वाटलं जातं. पश्चिम बंगालमधील महिलेनेही असंच काहीसं करत नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. महिला लग्नातील कपडे आणि दागिने परिधान करूनच गरजूंना जेवण देण्यासाठी गेली. यामुळे अन्न वाया गेलं नाही आणि गरजूंची पोटंही भरली. तिच्या या कृतीचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
वेडिंग फोटोग्राफर निरंजन मंडल याने या महिलेचा फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. महिलेचं नाव पपिया कर असल्याचं समोर आलं आहे. कोलकात्याच्या एका स्टेशनवर गरजूंना जेवण वाढतानाचा हा फोटो आहे. भावाच्या लग्नात जेवण उरल्यानंतर तिने ४ डिसेंबरच्या रात्री १ वाजता स्टेशनवर जाऊन गरजूंना जेवण दिलं. कोलकात्यातील उपनगरीय रेल्वे स्टेशन रानाघाट जंक्शनवरील हा फोटो आहे. लग्नातील कपड्यांवर ती जमिनीवर बसून लोकांना जेवण देत असल्याचं दिसत आहे. वरण, भात, भाकरी आणि भाजी व्यतिरिक्त अन्य व्यंजन होती. पपियाने जसं जेवण वाटण्यास सुरुवात केली. तशी लोकांची लांबच लांब रांग लागली.
पपियाने यापूर्वीही अनेकदा गरजवंतांना जेवण वाटलं आहे. त्यामुळे तिच्या कामाचं प्रत्येक जण कौतुक करत आहे. फेसबुकवर आतापर्यंत अनेकांनी हा फोटो शेअर केला आहे. तसेच इतरांनीही अशीच कृती करावी असा सल्ला दिला आहे.