समुद्रातील मोठ्या आकाराच्या माश्यांचे सर्वांनाच कायमच आकर्षण असते मग ती डॉल्फीन असो किंवा व्हेल. परदेशामध्ये अनेक ठिकाणी माशांचे खेळ दाखवणारे पार्कही आहेत. मात्र सध्या सोशल नेटवर्किंगवर चर्चा आहे नॉर्वेजवळच्या समुद्रातील एका स्मार्ट व्हेल माश्याची. या व्हेल माश्याने एका तरुणीकडून चुकून समुद्रात पडलेला फोन परत आणून दिला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे.
नॉर्वेमधील हॅमरफेस्ट बेटसमुहांजवळ हा सर्व प्रसंग घडला. लॅडबीबल ग्रुप या युनायटेड किंग्डममधील समाजसेवी संस्थेच्या मालकिचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. बेलुगा प्रजातीमधील हा व्हेल मासा पांढऱ्या रंगाचा असतो. एका शक्यतेनुसार रशियन नौदलाकडून व्हेल माश्यांना हेरगिरीसाठी प्रशिक्षण दिले जाते. त्याच व्हेल माश्यांपैकी हा एक मासा असल्यानेच त्याने हा मोबाइल परत आणून दिल्याचा दावा केला जात आहे. हॅमरफेस्ट येथील इना मानसिका आणि तिच्या मैत्रिणी याच व्हेल माश्याला पाहण्यासाठी बोटीमधून समुद्रात गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना केवळ हा मासा दिसलाच नाही तर त्याने आपल्या दिलदारपणाही त्यांना दाखवला.
द डोडो या वेबसाईटला इनाने दिलेल्या माहितीनुसार व्हेल पाहण्यासाठी ती आणि तिच्या मैत्रिणी बोटून समुद्रात गेल्या. त्यावेळी समुद्रात त्यांना तो व्हेल मासा दिसला. त्याला हात लावण्याच्या नादात इनाचा मोबाइल पाण्यात पडला. ‘मी माझ्या जॅकेटच्या खिशाची चैन लावायला विसल्याने माझा फोन समुद्राच्या पाण्यात पडला. मला तो फोन आता कायमचा गेला असं वाटलं. पण तितक्यात त्या व्हेलने पाण्यात डुबकी मारली. त्यानंतर काही क्षणांमध्ये तोंडात फोन घेऊन तो मासा पुन्हा बोटीजवळ आला आणि आम्ही तो फोन त्याच्या तोंडातून काढून स्वत:च्या ताब्यात घेतला,’ असं इनाने सांगितले. तुम्हीच पाहा व्हिडिओ
‘या प्रकरामुळे आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला. खरचं या माश्याने माझा समुद्रात पडलेला फोन आणून दिला की हे स्वप्न होते यावर आमचा विश्वासच बसत नव्हता. मला माझा फोन परत मिळाल्याचा खूप आनंद झाला,’ असं इनाने ‘डोडो’शी बोलताना सांगितले. हा फोन पाण्यात पडल्यामुळे तात्पुरता बंद पडला तरी तो परत मिळाल्याने इना खूपच खूष झाली.