अगदी लहानपणापासूनच आपल्याला शिस्तीचे महत्त्व समजावले जाते. मात्र मोठं झाल्यानंतर प्रत्येकालाच याचा विसर पडतो. लहान मुलांपेक्षा मोठ्यांनाच वारंवार नियम समजावून सांगावे लागतात. यासाठी सरकारही अनेक प्रयत्न करत असते. लोकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यासाठी वेगवेगळे फलकही लावले जातात. मात्र एक राज्य असेही आहे, जेथे नागरिक स्वतः अशा नियमांचं पालन करताना दिसतात. यासंबंधीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
हा फोटो मिझोराम या राज्यातील आहे. आयझॉलमधील एका स्थानिकाने शहराच्या मुख्य रस्त्यावरील रहदारीचे अविश्वसनीय दृश्य शेअर केले आहे. ट्राफिक अनेकदा लोकांच्या वाहन चालवण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळेच होते. मात्र मिझोराममध्ये अगदी याउलट चित्र पाहायला मिळते. येथील लोकांची सभ्यता आणि त्यांच्याकडून नियमांचे केले जाणारे काटेकोर पालन पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. यानंतर हा फोटो तुफान व्हायरल झाला आहे.

हा फोटो पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल की या राज्यातील लोक वाहतुकीच्या नियमांच्याबाबतीत किती काटेकोर आहेत. विशेषतः येथील दुचाकीचालकांना पाहून अप्रूप वाटते. आपल्या देशातील अनेक शहरांमध्ये दुचाकीचालक कसेही वाहन चालवून ट्राफिकजॅममधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. मात्र मिझोराममधील लोक वन-लेन नियम पाळण्यासाठी एकामागोमाग एक अशी रांग लावून उभे असलेले आपण या फोटोमध्ये पाहू शकतो. मिझोराममधील रांगेची ही शिस्त प्रत्येक राज्यासाठी एक आदर्श आहे.
मिझोराममधील एक अरुंद रस्ता काही कारणामुळे दुपदरी म्हणून वापरण्यात येत होता. यामुळे पायाभूत सुविधांचा अभाव होऊन रस्त्यावरील वाहतूक नियमनामध्ये अडथळा निर्माण झाला होता. मात्र असे असतानाही सर्व दुचाकीस्वार पुढे जाण्यासाठी संयमाने रांगेत एकामागोमाग एक उभे होते.

मात्र मिझोराममधील अशा रांगेच्या शिस्तीचे दर्शन घडवणारा हा पहिलाच फोटो नाही. याआधीही यासंबंधीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारतातील अनेक लोक त्यांच्या शहराची तुलना मिझोरामशी आणि येथे राहणाऱ्या लोकांशी करतात. येथील लोक रस्त्यावरील भांडणावर अनेकदा शांतपपणे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. इतर राज्यांमध्ये मात्र अगदी याउलट परिस्थिती पाहायला मिळते.