तोटयात असलेल्या ‘एअर इंडिया’ला अखेर शुक्रवारी म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी नवीन मालक मिळाला आहे. सरकारच्या मालकीची ही विमान कंपनी खरेदीसाठी टाटा समूहाने लावलेली बोली केंद्रातील मोदी सरकारने स्वीकारली आहे. याचबरोबर जवळजवळ सात दशकांनंतर पुन्हा एकदा कंपनीची मूळ मालकी टाटांकडे येणार आहे. मागील आठवड्यात झालेल्या या ऐतिहासिक निर्णयावर भारतीय उद्योग जगतामधील मोठं प्रस्थ आणि महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय.

नक्की वाचा >> “हा तर टाटा इफेक्ट”: २०१७ नंतर पहिल्यांदाच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना…

“मी कदाचित या घटनेवरुन फार जास्त बोलल्याचा आरोप केला जाईल पण मला वाटतं की या निर्गुंतवणुकीकरणामधून भारतामधील उद्योग जगताला पुन्हा नव्याने सुरुवात करता येईल. सरकार रोख रक्कमेचा पुरठा करु पाहता आहे. मात्र अनेक दशकांनंतर आता सरकार पुन्हा एकदा खासगी क्षेत्रातील कार्यक्षमतेवर नव्याने विश्वास ठेऊ पाहत आहे,” असं आनंद महिंद्रांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

अर्थमंत्रालयातील निर्गुतवणूक विभाग म्हणजेच ‘दिपम’चे सचिव असणाऱ्या तुहिन कांता पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आणि टाटा सन्सदरम्यान झालेल्या एअर इंडियाच्या सौद्यामध्ये टाटा सरकारला दोन हजार ७०० कोटी रुपये रोख देणार आहेत. या मोबदल्यात सरकार आपला कंपनीतील १०० टक्के वाटा टाटांच्या नावे करणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार सरकारला या व्यवहारामधून १२ हजार ९०३ कोटींची अपेक्षा असताना टाटांनी १८ हजार कोटींना ही कंपनी विकत घेण्याची तयारी दर्शवली असून कंपनीवरील सर्व कर्जही टाटाच फेडणार आहेत. 

नक्की पाहा >> कपडे, खेळणी, टॅक्सी, फर्निचर, गाड्या, इंधन अन्… रतन टाटांनी गुंतवणूक केलेल्या Startups मध्ये मराठमोळ्या मुलीच्या कंपनीचाही समावेश

२०२० पासून सुरू केलेली प्रक्रिया
‘एअर इंडिया’मधील १०० टक्के भागभांडवल विकण्याची प्रक्रिया केंद्राने जानेवारी २०२० पासून सुरू केली होती. शिवाय, तिच्या उपकंपन्या म्हणजेच एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेडमधील १०० टक्के हिस्सा आणि एअर इंडिया सॅट्स एअरपोर्ट्स सव्‍‌र्हिसेस प्रा. लि.मधील ५० टक्के हिस्सा विकण्याचे सरकारने प्रस्तावित केले. मात्र करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे या प्रक्रियेस विलंब झाला. नंतर एप्रिल २०२१ मध्ये सरकारने उत्सुक कंपन्यांना पुन्हा वित्तीय बोली लावण्यास सांगितले. बोली लावण्यासाठी १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत दिली गेली होती.

टाटा पुन्हा होणार मालक
‘एअर इंडिया’ची मालकी ‘टाटा’कडे जाणार असल्याने त्या उद्योग समूहाला त्यांनीच स्थापलेल्या या हवाई सेवेची मालकी ६७ वर्षांनंतर पुन्हा मिळणार आहे. जेआरडी टाटा यांनी १९३२ साली ‘टाटा एअरलाइन्स’ या नावाने स्थापन केलेल्या या कंपनीचे, पुढे १९४६ मध्ये ‘एअर इंडिया’ असे नामकरण केले गेले. १९४८ मध्ये ‘एअर इंडिया इंटरनॅशनल’ने युरोपसाठी उड्डाणेही सुरू केली. मात्र १९५३ मध्ये सरकारने एअर इंडियावर ताबा घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण केले.

Story img Loader