परतीच्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून पुण्यात मुक्काम ठोकला आहे. शहरात सलग दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाचा जोर बुधवारी रात्रीपासून वाढला आहे. पुण्यात अनेक ठिकाणी ढगफुटी झाली आहे. पुण्यातील काही भागांमध्ये अवघ्या काही तासांमध्ये शंभर ते दीडशे मिलीमीटर पाऊस पडल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र ढगफुटी म्हणजे नक्की काय? ती कशी होते? त्याचे काय परिणाम होतात? आत्तापर्यंत सर्वात मोठी ढगफुटी कधी आणि कुठे झाली आहे? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे लोकप्रभामध्ये प्रशांत दीक्षित यांनी लिहिलेल्या या लेखामध्ये आहेत…

लेहमध्ये ६ ऑगस्ट २०१० रोजी झालेली ढगफुटी ही जगाला आजपर्यंत माहित असलेल्या ढगफुटींच्या घटनांतील सर्वात मोठी ढगफुटी मानली जाते. अगदी थोडय़ा काळात इतक्या मोठय़ा प्रमाणात जगात आजपर्यंत कुठेही पाऊस पडलेला नाही. अवघ्या एका मिनिटात दोन इंच पाऊस.. ढगफुटी या शब्दातच या घटनेचा अर्थ स्पष्टपणे कळतो. टाकीचा संपूर्ण तळच निघाला तर टाकीतील पाणी जसे वेगाने खाली पडेल तसेच येथे होते. फक्त येथे कित्येक मैल पसरलेला पाण्याचा ढग असतो आणि त्यामध्ये अब्जावधी गॅलन पाणी भरलेले असते. आकाशातील पाण्याचा ढग अक्षरश फुटतो आणि अगदी कमी वेळात पाण्याचा जणू स्तंभच जमिनीवर झेप घेतो.

increase in Rabi crop sowing country farming farmers
देशातील रब्बी पेरण्यांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या, पेरा किती हेक्टरने वाढला, गव्हाचे क्षेत्र किती
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
maharashtra cabinet approves rs 315 5 crore for repair leaks in temghar dam
टेमघर धरणाची गळती थांबणार;  जाणून घ्या, गळती रोखण्यासाठी किती कोटींची तरतूद
nuclear energy production information in marathi
कुतूहल : अणुऊर्जा – एक अपरिहार्य पर्याय
concepts of logos dialectic socrates philosophy
तत्त्व-विवेक : पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील ‘सॉक्रेटिक वळण’
Indian astronomers discover a giant cosmic web filament Spread over eight and a half million light years
खगोलशास्त्रज्ञांचे महत्त्वाचे संशोधन; शोधला वैश्विक जाळ्याचा तंतू
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
mauni amavasya at mahakumbh
मौनी अमावस्या म्हणजे काय? महाकुंभात त्याचे महत्त्व काय?

ढगफुटीच्यावेळी नेमके काय होते? या प्रक्रियेची सुरुवात कशी होते? विज्ञानाने अर्थातच याचा शोध घेतला आहे. गडगडाटी, वादळी पावसाला घेऊन येणारे ढगच यामध्ये असतात. ‘कुमुलोनिम्बस’ असे या ढगांचे नाव आहे. हा लॅटिन शब्द आहे. क्युम्युलस म्हणजे एकत्र होत जाणारे व निम्बस म्हणजे ढग. थोडक्यात झपाटय़ाने एकत्र होत जाणारे पावसाळी ढग ही सुरुवात असते.

गरम हवा व आद्र्रता यामुळे ढगांमधील पाण्याचे प्रमाण वाढत जाते. पाण्याचे अब्जावधी थेंब या ढगांमध्ये विखुरले जातात. यातूनच पुढे जोरदार पाऊस पडतो. पण कधीकधी या ढगांमध्ये वेगाने वर चढणारा हवेचा स्तंभ निर्माण होतो. याला अपड्राफ्टस् असे म्हणतात. पाण्याच्या थेंबाना घेऊन तो वरवर चढत निघतो. हा निसर्गाचा विलक्षण खेळ असतो. या स्तंभाबरोबर वेगाने वर चढताना पाण्याचे थेंब चांगले गरगरीत होऊ लागतात. कधीकधी ३.५ मिमीहून मोठे आकारमान होते. काहीवेळा या वर चढणाऱ््या हवेच्या स्तंभात अतिशय गतिमान असे वारे निर्माण होतात. ढगातच छोटी छोटी वादळे उठतात. या वादळात पाण्याचे थेंब सापडतात. वादळात वेगाने गिरक्या घेत असताना एकमेकांवर आदळतात आणि या मस्तीत एकमेकांमध्ये मिसळून आणखी मोठे होत जातात. हवेचा स्तंभ आता पाण्याच्या मोठमोठय़ा थेंबाना घेऊन वरवर चढू लागतो.

हवेच्या स्तंभाची जितकी ताकद असेल तितका तो वर चढतो आणि मग जत्रेतील चक्राचा पाळणा जसा झपकन खाली येऊ लागतो तसेच या स्तंभाचे होते. या स्तंभाने तोलून धरलेले पाण्याचे मोठे थेंब त्या पाळण्याप्रमाणेच अतिशय वेगाने खाली झेपावतात. यावेळी त्यांना स्तंभातील ऊर्जाही मिळालेली असते. सुसाट वेगाने ते जमिनीकडे येतात. हवेचा स्तंभ आता जमिनीच्या दिशेने तयार होतो. याला डाऊनड्राफ्ट असे म्हणतात. थेंबाचा वेग प्रथम साधारणपणे ताशी १२ किमी असतो. तो बघता बघता ताशी ८० ते ९० किमीपर्यंत पोहोचतो.

ढग मोठा असला तरी त्याचा विस्तार जास्त नसतो. यामुळे जमिनीवरील लहानशा भागात पाण्याचा जणू स्तंभ कोसळतो. मोठाले थेंब व प्रचंड वेग यामुळे जमीन व त्यावरील सर्व काही अक्षरश झोडपून निघते. झाडे, लहान प्राणी, कच्च्या इमारती यांच्यासाठी पाण्याचा हा मारा धोकादायक असतो. जमिनीची पाणी शोषून घेण्याची वेगवेगळ्या ठिकाणची क्षमता वेगवेगळी असते व पाणी शोषून घेण्यासाठी वेळही लागतो. येथे काही मिनिटातच प्रचंड पाणी ओतले गेल्यामुळे पाणी शोषून घेण्याचे जमिनीचे कामच थांबते आणि जिकडे-तिकडे पुरासारखी स्थिती निर्माण होते. ढगफुटी डोंगरावर झाली तर पाण्याचे लोंढे डोंगरावरून निघतात. त्यांच्याबरोबर मोठय़ा प्रमाणात माती पायथ्याकडे ढकलली जाते.

वरती चढणारा स्तंभ व खाली येणारा स्तंभ यांच्यामुळे हे सर्व घडते. यापैकी डाऊनड्राफ्ट हे जास्त धोकादायक असतात. हवेचा हा स्तंभ जेव्हा वेगाने जमिनीवर आदळतो तेव्हा ती ऊर्जा तितक्याच वेगाने आजूबाजूला फेकली जाते. यामुळे पाण्याबरोबर चारी दिशेने वाऱ्याची वावटळ उठते. हे वारे कधी ताशीदीडशे ते दोनशे किमी इतका वेग घेतात. या वावटळीमुळे लहान झाडे एका रेषेत झोपल्यासारखी मोडून पडतात. विमानांसाठी हवेचे हे स्तंभ सर्वात धोकादायक असतात. विमान अशा स्तंभात सापडले तर हमखास कोसळते. जगातील अनेक विमान अपघातांना हवेचे हे स्तंभ कारणीभूत ठरले आहेत. किंबहुना या अपघातांमुळेच या स्तंभांचा अभ्यास सुरू झाला.

ढगफुटीच्या वेळी आणखी एक अनोखी घटना घडते. मात्र त्याची मौज घेण्याचे भान कुणालाही नसते. ढगफुटीच्या आधीच हवामान अर्थातच पावसाळी असते. काळोखी दाटत जाते. मात्र प्रत्यक्षात पाऊस पडताना काळोखाचे प्रमाण एकदम कमी होते. कधीकधी जणू सूर्यप्रकाशात पाऊस पडल्यासारखा भासतो. पावसाचे भलेमोठे थेंब हे याचे कारण आहे. हे थेंब आरशाप्रमाणे काम करतात व प्रकाश परावर्तित करीत राहतात. यामुळे नेहमीपेक्षा जास्त प्रकाश दिसतो. थेंबाचा पृष्ठभाग वाढल्यामुळे नेहमीच्या थेंबापेक्षा चारपट अधिक प्रकाश ढगफुटीच्या थेंबातून परावर्तित होतो.

ढगफुटी ही हिमालयासाठी नवीन गोष्ट नाही. दरवर्षी मान्सून पठारावरून हिमालयाच्या भेटीला जातो. अरबी समुद्र व बंगालचा उपसागर यातून घेतलेले पाणी तेथे नेऊन ओततो. हिमालयात असे ढग अनेकदा फुटतात. मात्र बहुदा ही ढगफुटी खूप डोंगराळ भागात होत असल्याने त्याची बातमी होत नाही. मनुष्यवस्तीत ती घडली की लगेच आपले लक्ष वेधून घेते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी पडलेला पाऊस हा ढगफुटीचाच प्रकार होता. त्या दिवशी आठ तासात ९५० मिमी पाऊस पडला. वेग व थेंबांचा आकार आणि पाणी घेऊन येणारा हवेचा स्तंभ जमिनीवर आदळल्यावर होणारे परिणाम यामुळे ढगफुटीतून अपरिमित नुकसान होते. यावर उपायही काही नसतो. निसर्ग मस्तीत येऊन धुमाकूळ घालतो. हे त्याचे तांडवनृत्य असते. ते समजून घेताना छान वाटते, पण अनुभवताना जीवघेणे ठरते. लेहवासीय सध्या तोच अनुभव घेत आहेत.

अभिनेता फरहान अख्तरने मागील वर्षी सोशल मीडियावर ढगफुटीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून क्षणभरासाठी तुमचा स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.

ढगफुटीच्या प्रमुख घटना

* लेह (६ ऑगस्ट २०१०) फक्त एका मिनिटात ४८.२६ मिमी पाऊस
* बरोट, हिमाचल प्रदेश, (२६ नोव्हेंबर १९७०) एका मिनिटात ३८.१० मिमी पाऊस
* पोर्ट बेल, पनामा (२९ नोव्हेंबर १९११) पाच मिनिटांत ६१.७२ मिमी पाऊस
* प्लंब पॉईंट, जमेका (१२ मे १९१६) पंधरा मिनिटात १९८.१२ मिमी पाऊस
* कर्टिआ, रुमानिया (७ जुलै १९४७) वीस मिनिटांत २०५.७४ मिमी पाऊस
* व्हर्जिनिया, अमेरिका (२४ ऑगस्ट १९०६) चाळीस मिनिटांत २३४ मिमी पाऊस

Story img Loader