सध्या ‘बॉयकॉट’ ही गोष्ट फारच किरकोळ झाली आहे. सोशल मीडियावर तर रोज कसल्या ना कसल्या कारणावरुन बॉयकॉट ट्रेंड व्हायरल होतच असतो. फक्त कला, साहित्य, चित्रपटच नव्हे तर जाहिरातीमधूनसुद्धा हा बॉयकॉट ट्रेंड फोफावत चालला आहे. मध्यंतरी आमिर खानने केलेल्या एयू बँकच्या जाहिरातीमुळे त्या बँकेला चांगलाच फटका बसला होता. आता असाच बॉयकॉट ट्रेंड व्हायरल होत आहे, यावेळीस बॉयकॉट गँगच्या रडारवर आहे देशातील आघाडीची चॉकलेट कंपनी कॅडबरी.
ट्विटर आणि इतर सोशल मीडिया माध्यमांवर सध्या ‘बॉयकॉट कॅडबरी’ हा ट्रेंड चांगलाच जोर धरू लागला आहे. मध्यंतरी कॅडबरीच्या प्रॉडक्टमध्ये गोमांस वापरत असल्याची अफवा बाहेर आली होती, पण आता या नव्या बॉयकॉट ट्रेंडला निमित्त ठरलं आहे ते म्हणजे कॅडबरीची नवी जाहिरात. दीपावलीच्या मुहूर्तावर कॅडबरीने एक जाहिरात केली आहे. या जाहिरातीमधून ऑनलाइन व्यवहाराचं महत्त्व पटवून दिलं आहे. या जाहिरातीमध्ये एक दिवा विकणारे गृहस्थ दाखवले आहेत. त्यांच्या नावावरुन हा सगळा बॉयकॉट ट्रेंड व्हायरल होत असल्याचं समोर येत आहे.
आणखी वाचा : ‘कांतारा’ स्टार रिषभ शेट्टीने घेतली भूमिकेसाठी विशेष मेहनत; म्हणाला, “मी २०-३० दिवस मांसाहार…”
विश्व हिंदू परिषदेच्या महिला नेता डॉ. प्राची साध्वी यांनी ही जाहिरार ट्वीट करून तिचा संबंध थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जोडला आहे. या जाहिरातीत त्या दिवा विकणाऱ्या गृहस्थाचे नाव दामोदर दाखवल्याने बऱ्याच लोकांनी यावर आपत्ती दर्शवली आहे. साध्वी आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, “तुम्ही कॅडबरीची नवी जाहिरात काळजीपूर्वक पाहिली आहे का? या दिवा विकणाऱ्या व्यक्तीचे नाव दामोदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांचे नावही दामोदरच आहे, आणि यातून अयोग्य चित्रण केल्याचं समोर आलं आहे. चहावाल्याचे वडील दिवेवाले असं दाखवताना कॅडबरीला कंपनीला लाज वाटत नाही?”
या एका ट्वीटमुळे सध्या सोशल मीडियावर चांगलंच वातावरण तापलं आहे. लोकांनी कॅडबरीच्या प्रॉडक्टमध्ये गोमांस असल्याचे पुरावेदेखील सादर करायला सुरुवात केली आहे. २०२१ मध्येसुद्धा कंपनीवर हेच आरोप लागले होते आणि तेव्हा कॅडबरीने आपली प्रॉडक्ट ही पूर्णपणे शाकाहारी असल्याचा दावाही केला होता. आता या जाहिरातीमुळे पुन्हा या वादाला नव्याने तोंड फुटलं आहे. अजून कंपनीकडून यावर अधिकृतरित्या काहीच स्पष्टीकरण आलं नसलं तरी हा ट्रेंड चांगलाच व्हायरल होत आहे.