Ambani Family : दूध हे पौष्टिक पेय आहे, जे नेहमी संतुलित आहाराचा भाग मानले जाते. दुधाच्या सेवनाने स्नायू, हाडे, नसा, दात, त्वचा आणि दृष्टी निरोगी ठेवण्यास मदत होते. तसेच दूधापासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्यास थकवा कमी होतो आणि अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात. यामुळे बहुतांश जण आहारात नियमितपणे पॅकेज केलेले दूध किंवा डेअरीतील दूध पितात. परंतु, तुम्हाला होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गायीच्या दुधाबद्दल माहिती आहे का, जी सर्वात जास्त दूध देणारी जात म्हणून ओळखली जाते. तसेच या गायीच्या दुधात प्रथिने, मॅक्रोन्यूट्रिएंट्स, आवश्यक फॅट आणि कर्बोहायड्रेटचे प्रमाण सर्वाधिक असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या विदेशी जातीच्या गायींचे पुण्यातील एका डेअरीत संगोपन केले जाते आणि तिचे दूध जगप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरी पोहोचवले जाते. मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबीय पुण्यातील या होल्स्टीन फ्रिजियन या खास विदेशी जातीच्या गायीचे दूध पितात.

अशा प्रकारे घेतली जाते गायीची काळजी

या जातीच्या गायींचे संगोपन पुण्याच्या हायटेक भाग्यलक्ष्मी डेअरीच्या माध्यमातून केले जाते. ही डेअरी सुमारे ३५ एकरात पसरलेली आहे. येथे ३००० हून अधिक विदेशी जातीच्या गायी आहेत. विशेष म्हणजे, या उच्च उत्पादन देणाऱ्या गायींसाठी हजारो रुपये खर्चून केरळमधून खास रबर कोटेड गाद्या आणल्या जातात. या गायींना पिण्यासाठी आरओ पाणी दिले जाते. या जातीची गाय दररोज २५ लिटर दूध देते, ज्यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे आणि प्रथिने भरपूर असतात.

होल्स्टीन फ्रिजियन गायीची जात कोणती आहे?

या गायीची जात मूळ नेदरलँडची आहे आणि जागतिक स्तरावर ती जगातील सर्वाधिक दूध देणारी जात म्हणून ओळखली जाते. या गायी काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या असतात, पण काहींचा रंग लाल आणि पांढरा किंवा निळा आणि पांढरा रंग असाही असतो. निरोगी होल्स्टीन फ्रिजियन गायीच्या वासराचे वजन जन्माच्या वेळी अंदाजे ५० किलो असते आणि प्रौढ गायीचे वजन सुमारे ७५० किलो असते.

या जातीच्या गायीत दररोज २५ लिटर आणि वार्षिक ९५०० लिटरहून अधिक दूध देण्याची क्षमता असते. होल्स्टीन फ्रिजियन विविध हवामान आणि व्यवस्थापन प्रणालींशी जुळवून घेतात. त्यामुळे उत्तर अमेरिका ते युरोप आणि त्यापलीकडे जगभरातील डेअरी फार्ममध्ये या जातीच्या गायी आढळतात.

या गायींच्या दुधात प्रथिने आणि बटरफॅट भरपूर असते, जे चीज आणि दही यांसारख्या दुग्धजन्य पदार्थांसाठी आवश्यक असते. तज्ज्ञांच्या मते, होल्स्टीन फ्रिजियन दूध हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसित दुग्धजन्य पदार्थ आहे, जे A1 आणि A2 बीटा केसिन (प्रोटीन) दोन्हीने समृद्ध आहे.