आपण अनेक कंपन्यांची उत्पादनं वापरतो, ते ब्रँड, कंपन्या आपल्या खूपच परिचयाच्या झालेल्या असतात. घरात अमुक एका ब्रँडची वस्तू हवी किंवा अमूक एक ब्रँड माझा खूपच आवडीचा आहे असे म्हणणारे खूप आहेत, पण अनेकदा तोंडात बसलेल्या या ब्रँडचा अर्थ किंवा नावाचा फुलफॉर्म आपल्याला माहिती नसतो. या नावाच्या मागे कधी कधी रंजक प्रसंग असतात तर कधी एवढं मोठं नाव बोलायला त्रास पडू नये म्हणून शॉर्टकट शोधले जातात. तेव्हा आपण अशाच काही प्रसिद्ध कंपन्यांच्या फुलफॉर्मचा आढावा घेणार आहोत. यातली एक कंपनी म्हणजे ‘बीएमडब्ल्यू’ ‘BMW’. मोठमोठ्या उद्योगपतींपासून ते सेलिब्रिटीपर्यंत सगळ्यांकडेच बीएमडब्ल्यूच्या गाड्या आहेत. या महागड्या गाड्या सर्रास आपल्या रस्त्यावर धावताना दिसतील.
वाचा : ‘LG’चा फुलफॉर्म माहितीये?
तर या ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱ्या बीएमडीब्ल्यूचा फुलफॉर्म माहितीय का तुम्हाला? ‘बेरिश मोटरेन वर्क’ चं संक्षिप्त रुप म्हणजे BMW होय. ही जर्मन कंपनी असून लक्झरी कारच्या निर्मितीसाठी ती ओळखली जाते. जर्मनीच्या म्यूनिच शहरात या कंपनीचं मुख्यालय आहे. या इमारतीची रचना ही एका इंजिन सारखी करण्यात आलीय. ऑटोमोबाईल इण्डस्ट्रीत येण्याआधी ही कंपनी एअरक्राफ्ट इंजिन बनवायची. पहिल्या महायुद्धानंतर या कंपनीवर एअरक्राफ्ट इंजिन बनवण्यात एका करारानुसार बंदी घालण्यात आली त्यानंतर या कंपनीने पहिल्यांदा मोटार सायकल बनवली होती. ७ मार्च १९१६ मध्येही कंपनी स्थापन करण्यात आली. डिक्सी ही बीएमडब्ल्यूने बनवलेली पहिली कार होय.