चाट पदार्थांमध्ये पाणीपुरी, शेव पुरीसोबत हमखास येणारे नाव म्हणजे भेळ. कांदा, टोमॅटो, मसाला आणि चटण्या चुरमुऱ्यांसोबत मिसळून मस्त चटपटीत असा हा पदार्थ खाण्यासाठी फारच मस्त लागतो. या भेळेत वापरले जाणारे चुरमुरे हे तांदळापासून बनवले जातात. मात्र सोशल मीडियावर कारखान्यामध्ये, गव्हापासून तयार होणाऱ्या मसालेदार चुरमुऱ्यांचा व्हिडीओ सध्या सगळ्यांच्या चर्चेत आहे.
इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून, @foodie_incarnate नावाच्या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यानुसार, हे चुरमुरे तयार करण्यासाठी सुरवातीला उच्च तापमानाच्या पाण्याच्या वाफेवर गहू वाफवले जातात. त्यानंतर ते गहू एका मोठ्या कढईतील कडकडीत पाम तेलात तळून काढले जातात. तेलात टाकल्यावर सर्व गहू मस्त फुलून आलेले आपण पाहू शकतो. तयार गव्हाचे चुरमुरे पुन्हा एका मशीनमध्ये घालून, त्यात मसाला घातला जातो आणि शेवटी सर्व तयार मसाला चुरमुरे एका गोणीत भरले जातात. अशी सर्व प्रक्रिया या व्हिडीओमधून शेअर करण्यात आलेली आहे.
हेही वाचा : Car tips : गाडी सारखी बंद पडत आहे? मग वाहनातील ‘हा’ भाग बदलण्याचा संकेत असू शकतो; पाहा….
व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, आपल्या नेहमीच्या म्हणजे, तांदुळाच्या चुरमुऱ्यांपेक्षा गव्हाचे चुरमुरे अधिक पौष्टिक असल्याचे समजते. मात्र यावर नेटकरी अजिबात सहमत नसल्याचे त्यांनी लिहिलेल्या प्रतिक्रियांवरून समजते. अनेकांना, पाम तेलातून तळून काढलेले चुरमुरे पौष्टिक कसे काय असू शकतात? असा प्रश्न पडला आहे. नेटकरी यावर नेमके काय म्हणाले आहे पाहा.
“आरोग्यासाठी पाम तेल अत्यंत खराब आहे.” असे एकाने लिहिले आहे. “भारतामध्ये जवळपास प्रत्येक खाद्यपदार्थात पाम तेलाचा वापर केला जातो. अगदी मोठमोठ्या कंपन्यासुद्धा त्याचाच वापर करतात. त्यामुळे मी बाहेरचे कोणतेही पदार्थ न खाता फक्त घरी बनवलेल्या गोष्टी खातो.” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “पाम तेल वापरल्यानंतर कोणतीही लॅब या पदार्थाला पौष्टिक म्हणणार नाही.” असे म्हंटले आहे. चौथ्याने, “तांदळापासून बनवलेले चुरमुरे तळले जात नाहीत.” असे सांगितले. तर शेवटी पाचव्याने, “तुमच्या पेजवर नेहमी नवीन काहीतरी पाहायला मिळत असते. त्यासाठी धन्यवाद.” असे आभार मानले आहेत.
इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत १३.१ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत.