जगात कोणतेही काम सोपे नसते. प्रत्येक कामासाठी मेहनत करावी लागते. अनेकदा आपल्या कामात अनेक अडचणी येतात तरीही हार न मानता, सतत प्रयत्न करत राहावे लागतात. अथक प्रयत्नानंतरच व्यक्तीला यश मिळते. पण अनेकदा लोकांना स्वत:चे काम खूप आव्हानात्मक वाटते. अशावेळी काम करण्याचा उत्साह वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहनाची आवश्यकता असते. आपल्या आसपासच्या लोकांकडून कित्येकदा हे प्रोत्साहन मिळते. कधी संवादातून मिळते तर कधी एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपल्यापेक्षा किती जास्त आव्हाने आहेत याची जाणीव झाल्यानंतर प्रोत्साहन मिळते. असेही काहीसा अनुभव उद्योगपती आनंद महिंद्रा यांना देखील आला आहे.
आनंद महिंद्रा नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावरील अनेक प्रेरणादायी व्हिडीओ ते पाहतात आणि त्यांच्या चाहत्याबरोबर शेअर करतात. अनेकदा प्रामाणिकपणे मेहनत करणाऱ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात. सर्वांना प्रेरणा देणाऱ्या आनंद महिंद्रा यांना जेव्हा स्वत:चे काम फार आव्हानात्मक वाटते तेव्हा ते काय करतात याचा खुलासा त्यांनी केला आहे.
महिंद्राने एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला आहे जो त्यांना प्रेरणा देतो. व्हिडिओ शेअर कराना कॅप्शनमध्ये लिहिले की, ” अशी असते बांधकाम कर्मचाऱ्यांची सोमवारची सकाळ. जेव्हा मला माझे काम खूप आव्हानात्मक वाटते तेव्हा मी हे पाहतो”. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ केवळ प्रेरणा देत नाही तर बांधकाम कामगारांच्या कठोर परिश्रमाबद्दल आदर देखील निर्माण करतो.
हेही वाचा – तुम्ही ‘महाराष्ट्रीयन’ आहात की, ‘महाराष्ट्रीय? मराठी भाषेतील रोजच्या रोज चुकणारे ‘हे’ शब्द तुम्ही वापरता का?
व्हिडिओ बांधकाम कामगाराच्या आयुष्यातील एक दिवसाची झलक दाखवतो आहे. परंतु तो सामान्य दिवस नाही. व्हिडीओमध्ये बांधकाम कामगार साहित्य घेऊन जाताना दिसतो, हे काम पाहातक्षणी सोपे वाटू शकते. तथापि, व्हिडिओ जसजसा पुढे जात आहे, तसतसा हा कामगार कोणकोणत्या विलक्षण परिस्थितीत काम करतो हे समजते. हे कामगार अत्यंत उंच ठिकाणी, जमिनीपासून किती मैलांवर, उंच इमारतीवर काम करतात. व्हिडीओमध्ये इमारतीच्या उंचावरून दिसणारे शहराचे दृश्यही दाखवले आहे. हे पाहून लक्षात येते की हे बांधकाम कामगार स्वत:चा जीव धोक्यात टाकून उंच इमारतीवर कशाप्रकारे काम करतो.
हा व्हिडिओ शेअर करून, महिंद्राने त्यांच्या चाहत्यांचा सोमवारचा दिवस नव्या ऊर्जेने हाताळण्यासाठी केवळ प्रेरणा दिली नाही तर, बांधकाम कामगारांच्या कठोर परिश्रमाचेही कौतुक केले.