सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात, यातील काही व्हिडीओ आपणाला चांगला धडा शिकवतात. सद्या IAS दिव्या मित्तल यांचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत. त्यामुळे सार्वजनिक जीवनात काम करताना आपण लोकांच्या भावनांचा आदर राखला आणि प्रामाणिकपणे काम केलं तर लोकं तुमच्यावर किती प्रेम करु शकतात, हेच या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
खरं तर सर्वसामान्य लोकांची सरकारी अधिराऱ्यांबाबतचे मतं फारशी चांगले नसतात. याबाबत अनेकजण उघडपणे भाष्य करत असतात. मात्र, काही काही सरकारी अधिकारी दिव्या मित्तल यांच्यासारखेही असतात ज्यांचा लोकं मनापासून आदर करतात. मित्तल या मिर्झापूरच्या जिल्हा दंडाधिकारी होत्या इथे काम करताना त्यांनी आपल्या कामाने लोकांची मने जिंकल्याचं व्हिडीओत दिसत आहे. कारण मित्तल यांची बदली झाल्यावर त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमून त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली आहे.
दिव्या मित्तल यांना आता बस्तीच्या जिल्हा दंडाधिकारी म्हणून नवीन जबाबदारी मिळाली आहे, याआधी त्या मिर्झापूरमध्ये जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होत्या. मिर्झापूरमध्ये डीएम असताना दिव्या मित्तल यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते, ज्यात त्या जिल्ह्याच्या विकासाबाबत अधिकाऱ्यांना फटकारत असल्याचं दिसत होतं. लोकांना मदत केल्यामुळेही त्या सतत चर्चेत राहिल्या त्यामुळेच त्यांना निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने जमले होते.
लोकांनी केला फुलांचा वर्षाव
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, दिव्या मित्तल बसलेल्या असून लोक त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर असा निरोप मोजक्या लोकांच्या नशीबात असतो असं नेटकरी म्हणत आहेत. तर, देशाला अशा अधिकाऱ्यांची गरज आहे, ते जिथे असतील तेथील लोकांना त्यांचा फायदा होईल, असंही काही लोक म्हणत आहेत.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
मोहित गोयल नावाच्या नेटकऱ्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, या कोणी सेलिब्रिटी किंवा सुपरस्टार नाहीत, तर मिर्झापूरच्या आउटगोइंग डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट श्रीमती दिव्या मित्तल आहेत, ज्यांनी आपल्या कामाने मिर्झापूरच्या नागरिकांची मने जिंकली आहेत. तर दुसर्या एकाने लिहिलं, “मिर्झापूरच्या जनतेने आयएएस दिव्या मित्तल यांना ऐतिहासिक निरोप दिला. क्वचितच अधिकाऱ्यांना असा निरोप मिळतो.” विमल पांडे यांनी लिहिलं, “त्यांनी सार्वजनिक सेवेच्या कार्याची दखल घेऊन जनतेने दिव्या मित्तल यांना फुलांनी सजवलेल्या गाडीतून निरोप दिला. त्यांनी आपल्या नाविन्यपूर्ण कामांनी मिर्झापूरच्या लोकांची मने जिंकली आहेत.”