भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेतील लोकप्रियता सर्वज्ञात आहे. पण सध्या सोशल मिडीयावर व्हाईट हाऊसमधील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या लोकप्रियतेची चर्चा रंगली आहे. व्हाईट हाऊसमधील छायाचित्रकार पेटे सूजा यांनी ओबामांच्या कारकिर्दीतील काही निवडक क्षण प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या कॅमेरामध्ये कैद केलेल्या मनमोहन सिंग यांच्या ओबामांसोबतच्या छायाचित्राला अव्वल स्थान दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा व्हाईट हाऊसमधील प्रवास अखेरच्या टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर व्हाईट हाऊसमध्ये एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी इटलीचे पंतप्रधान मैटो रेंजी आणि त्यांची पत्नी अगनेसी मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये जगातील ४०० प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली होती. हा कार्यक्रम व्हाईट हाऊसचे प्रमुख छायाचित्रकार पेटे सूजा यांच्यासाठी खास असाच होता. यावेळी त्यांनी ओबामांच्या कारकिर्दितील आतापर्यंत आपल्या कॅमेरामध्ये कैद झालेल्या फोटोपैकी काही निवडक छायाचित्रे प्रसिद्ध केली.
यामध्ये त्यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांच्या व्हाईट हाऊसमधील भेटीला सर्वोच स्थान दिले आहे. ओबामा यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर २४ नोव्हेबर २००९ मध्ये भारताचे माजी पंतप्रधान आणि त्यांची पत्नी गुरुशरण कौर यांनी प्रमुख ओबामा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. मनमोहन सिंग यांच्या या भेटीतील क्षणाला सूजा याने पहिले स्थान दिले आहे. या फोटोमध्ये मिशेल ओबामा गुरुशरण कौर यांना घेऊन जाताना दिसत आहेत. तर बराक ओबामा या फोटोमध्ये मनमोह सिंग यांच्यासोबत दिसत आहेत. फोटोग्राफर पेटे सूजा याने हा फोटो पाठमोऱ्या बाजूने टिपला आहे.
मनमोहन सिंग यांच्या फोटो व्यतिरिक्त कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन थ्रेड्यू , चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, मेक्सिकोचे राष्ट्रपती फिलिप कोल्ड्रेन, जर्मनच्या चान्सलर एंजेला मर्केल फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांस्वा ओलांद यांचा या विशेष छायाचित्रांमध्ये समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रास यामध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

Story img Loader