टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर टीका केली आहे. २००४ सालच्या ‘अँकरमॅन: द लीजेंड ऑफ रॉन बरगंडी’ या चित्रपटातील एका दृश्याचा फोटो शेअर करत मस्क यांनी बायडेन यांच्यावर टीका केली आहे. टेलिव्हिजनवरील भाषणादरम्यान बायडेन चुकून टेलिप्रॉम्प्टरवर लिहिलेल्या सूचना वाचत होते. याच व्हिडीओला उत्तर देत, मस्क यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, “जो कोणी टेलिप्रॉम्प्टर नियंत्रित करतो तोच खरा राष्ट्रपती!”, असे म्हटले आहे.
मस्क यांनी शेअर केलेला फोटो हा प्रसिद्ध चित्रपटातील एक सीन आहे. यामध्ये चित्रपटाच्या नायकानेही अशीच चूक केलेली दाखवण्यात आली आहे. चित्रपटामध्ये नायकही टेलिप्रॉम्प्टरमुळे अशीच चूक करतो आणि स्वतःचेच नाव वाचतो. मस्क यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये, “शेवटच्या वेळी, तुम्ही त्या प्रॉम्प्टरवर काहीही टाकाल आणि बरगंडी ते वाचेल,” असे म्हटले आहे. बायडेन यांचा “कोट संपला, ओळ पुन्हा वाचा” असे म्हणत असलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गर्भपातासंदर्भात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निर्णयानंतर त्यासंदर्भातल्या हक्कांना संरक्षण देण्याबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भूमिका मांडत असताना हा किस्सा घडला.
टेलीप्रॉम्टर म्हणजे नक्की काय असतं?
यापूर्वीही, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत टेस्लाच्या योगदानाकडे बायडेन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मस्क यांनी केला होता. बायडेन यांनी एकदा अमेरिकन काँग्रेसला संबोधित करताना वाहन कंपन्यांचा उल्लेख केला होता. त्यांनी म्हटले की, ‘फोर्ड आणि जनरल मोटर्स यांनी इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासोबतच रोजगार वाढवण्याच्या दिशेने चांगले काम केले आहे.’ यामध्ये बायडेन यांनी टेस्ला (Tesla) या कंपनीचे नाव घेतले नाही. ही गोष्ट एलन मस्क यांना खटकली. त्याशिवाय, मस्क यांनी जो बायडेन यांच्याबद्दल अनेकदा आक्रमक टिप्पण्या केल्या आहेत.