झटपट श्रीमंत होण्यासाठी अनेक लोक बुद्धीचा कस लावून नवनवीन रणनीती आखण्याचा प्रयत्न करतात. बदलत्या जीवनशैलीमुळं गडगंज श्रीमंती मिळवण्यासाठी काही जण काबाडकष्ट करतात. पण एका गावात राहणाऱ्या १६५ हून अधिक लोकांचं नशीबच चमकलं आहे. आख्खा गावंच मालामाल झाला आहे. या गावातील लोकांनी १२०० कोटींपेक्षा जास्त रक्कम एका लॉटरीत जिंकली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या खात्यात जवळपास ७ कोटी ५० लाख रुपये जमा झाले. एवढी मोठी रक्कम जिंकल्यानंतर बेल्जीयमच्या एंटवर्प प्रांतातील ओलमेन गावात जल्लोष केला जात आहे.
डेली मेलनं दिलेल्या माहितीनुसार, ओलमन गावातील १६५ लोकांनी एकत्रितपणे यूरोमिलियन लॉटरीचं तिकिट खरेदी केलं होतं. यासाठी प्रत्येक व्यक्तीने १३०८ रुपयांची गुंतवणूक केली होती. गेल्या मंगळवारी लकी ड्रॉ घोषीत करण्यात आला होता. त्यावेळी या लोकांच्या लॉटरीचा नंबर लागला. त्यामुळे या लोकांना बक्षिस म्हणून १२३ मिलियन पाउंड मिळणार आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम १२०० कोटींहून अधिकची रक्कम आहे.
गावातील १६५ लोकांना हे पैसे वाटल्यावर प्रत्येकाला जवळपास साडेसात कोटी रुपये मिळणार आहेत.
पैशांच्या विभाजनाबाबत गावकऱ्यांनी याआधीच ठरवलं होतं. पैशांचा हिस्सा प्रत्येकाला समान मिळणार, असं निर्णय घेण्यात आला होता. आपल्याला बेस्ट क्रिसमस गिफ्ट मिळालं आहे, असं काही लॉटरी विजेत्यांचं म्हणणं आहे. नॅशनल लॉटरीचे प्रवक्ता जोक वर्मोरे यांनी म्हटलं की, “ग्रुपमध्ये अशा प्रकारचं बक्षिस जिंकणं नवीन गोष्ट नाहीय. १६५ लोकांचा हा ग्रुप आतापर्यंतचा सर्वात मोठा लॉटरी विजेता आहे. लोकांना एवढी मोठी लॉटरी जिंकण्याबाबत विश्वास बसत नव्हता. त्यामुळे पाच सहा वेळा लॉटरी जिंकल्याबद्दल आम्हाला इतरांना सांगावं लागलं.”