Birth Year Simple Magic: तुम्हाला माहित आहे का की आज संपूर्ण जग एकाच वयाचे आहे! आजचा दिवस खूप खास आहे आणि दर हजार (१०००) वर्षांनी एकदाच येतो. असे सांगणारी एक पोस्ट सोशल मीडियावर आज तुफान व्हायरल होत आहे. किंबहुना आहे वर्ष संपेपर्यंत हे मेसेज एकदा ना एकदा तुमच्याही डोळ्यासमोर नक्कीच येतील पण यामध्ये तथ्य आहे का? आणि असल्यास हा नेमका प्रकार आहे तरी काय हे आता आपण पाहणार आहोत.
काय आहे व्हायरल पोस्ट?
सध्या प्रत्येकाचे वय 2023 आहे
तुम्हाला माहित आहे का की आज संपूर्ण जग एकाच वयाचे आहे! आजचा दिवस खूप खास आहे आणि दर हजार (१०००) वर्षांनी एकदाच येतो. ( तुमचे वय + तुमचे जन्म वर्ष,
प्रत्येक व्यक्तीच्या जन्मतारखेची बेरीज ही २०२३ च येईल.
उदाहरण
व्यक्ती ‘य’ ४० वर्षांचा आहे.
त्याचा जन्म १९८३ साली झाला.
तर ४०+१९८३ =२०२३
यानुसार तुम्ही तुमचे वय जरी तपासून पाहिले तरी तुमच्या लक्षात येईल की तुमच्याही वयाची बेरीज ही २०२३ इतकीच येत आहे.
आता राहिला मुद्दा हा खरोखरच १००० वर्षातून एकदा घडणारा योगायोग आहे का? तर नाही, ही खरंतर एक साधी गणिताची जादू आहे. व्याख्येनुसार, तुम्ही जन्मलेल्या वर्षात तुम्ही जगलेल्या वर्षांची संख्या जोडल्यास, तुम्हाला चालू वर्ष समोर दिसूच शकते.
हे ही वाचा<< ९९% लोक ‘या’ संख्यांचा पुढचा अंक शोधू शकले नाही! तुम्हाला कोणता पर्याय योग्य वाटतोय? उत्तर तपासा
प्रत्यक्षात दरवर्षी ३१ डिसेंबरला याप्रकारचा मेसेज हा व्हायरल होत असतो. कारण यासाठी तुमचा त्यावर्षातील वाढदिवस होऊन गेलेला असावा लागतो. ३१ डिसेंबरपर्यंत सर्वांचे वाढदिवस झाले असल्याने हा नियम प्रत्येकालाच लागू होतो. त्यामुळे एका अर्थी तुम्ही हे म्हणू शकता की ३१ डिसेंबर हा एकमेव दिवस असेल जेव्हा जगातील प्रत्येकाने त्यांचे वय आणि जन्म वर्ष जोडल्यास चालू वर्षाचा क्रमांक समोर येईल. हे गणित प्रत्येक वर्षी लागू होते त्यामुळे अगदी पुढच्या वर्षी सुद्धा तुमचा वाढदिवस झाल्यावर तुम्ही त्यावेळेच्या वयानुसार हा प्रयोग करून पाहिलात तरी असाच परिणाम समोर येईल.
यात योगायोग किंवा जादू नसली तरी गंमत म्हणून अशी बेरीज करून पाहणे हे मजेशीर ठरू शकते.