बाली हे इंडोनेशियातील सर्वात लोकप्रिय आकर्षणाच्या ठिकाणांपैकी एक आहे जिथे कित्येक पर्यटक जगभरातून भेट देण्यासाठी येतात. बाली जितका निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तितकाच तो निसर्गाच्या सानिध्यात, लांब सडक रस्त्यांवर बाईक रायडिंगसाठी देखील प्रसिद्ध आहे. बालीला जाणाऱ्या पर्यटकांसाठी निराशाजन माहिती समोर आली आहे. आता पर्यटकांना बेटावर भाड्याने मोटारसायकल वापरण्यास बंदी घालण्याची योजना आखली आहे. असा निर्णय का घेण्यात आला आहे याबाबत बालीच्या सरकारकडून खुलासा करण्यात आला आहे.
बालीमध्ये बाईक रायडिंगवर बंदी
गुरुवारी, बालीचे गव्हर्नर आय वायन कोस्टर म्हणाले की, पर्यटक ‘मोटारसायकल वापरून, शर्ट किंवा कपडे न घालता, हेल्मेट नसताना आणि परवाना नसतानाही बेटावर फिरतात.
प्रस्तावित बंदी या वर्षी प्रादेशिक कायद्याद्वारे लागू केली जाईल. पण त्याची अंमलबजावणी कशी होणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.
पर्यटकांच्या बेशिस्तीमुळे बाली सरकाराला घ्यावा लागला हा निर्णय
पोलिसांच्या नोंदीनुसार 171 हून अधिक परदेशी नागरिकांनी फेब्रुवारीच्या अखेरीपासून ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत वाहतूक नियमांचे उल्लंघन केले. काही पर्यटक बनावट लायसन्स प्लेट्सही वापरतात.
अगदी रस्त्यांवरही पर्यटकांकडून बेकायदेशीर किंवा अनादरकारक वर्तन केल्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. बेजबाबदारपणे वाहन चालवल्यामुळे अलिकडच्या काही महिन्यांत अनेक अपघात झाले आहेत.
मार्चमध्ये एका रशियन व्यक्तीला दारूच्या नशेत गाडी चालवल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती आणि जो स्थानिक ड्रायव्हरला धडकला होता. बालीमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
बेटावर फिरण्यासाठी मोटारसायकल भाड्याने घेतलेले पर्यटक पाहणे सामान्य आहे. किंबहुना, दुचाकी वाहने त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास, रहदारी टाळून आणि निसर्गरम्य गल्लीतून जाण्यास मदत करतात, कारण बेटावर चांगली विकसित अशी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही.
आताच ही बंदी का?
कोम्पास न्यूज आउटलेटनुसार.”पण ही बंदी आता का लागू केली जात आहे? असे विचारले असता आम्ही सध्या सर्वकाही नीटनेटके करत आहोत, [जसे] कोविड -19 साथीच्या दरम्यान आम्ही असे करू शकलो नाही कारण तेव्हा पर्यटक नव्हते,” असे त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्र साथीच्या आजारातून सावरल्यामुळे अराजकतेला तोंड देणे हे या प्रस्तावाचे उद्दिष्ट आहे.