अश्विन वद्य अमावस्येला घरोघरी लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी बलीच्या बंदिवासातुन लक्ष्मीची सुटका झाली. त्यामुळे सर्वांना आनंद झाला. अशी अख्यायिका आहे. तिचे वास्तव्य आपल्या घरात कायमचे रहावे, अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यासाठी सर्वजण लक्ष्मीमातेची भक्तिभावाने पूजा करतात. व्यापारी लोकही यादिवशी लक्ष्मीपूजन करतात.
कोजागीरीस लक्ष्मी व इंद्र या देवतांचे पूजन केले जाते. तर या अमावास्येला लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही संपत्तीची देवता तर कुबेर हा संपत्ती-संग्राहक असल्याचे मानले जाते. अनेकांना पैसे मिळविण्याची कला साध्य आहे, पण तो राखावा कसा हे माहीत नाही; किंबहुना पैसा मिळविण्यापेक्षा तो राखणे, सांभाळणे व योग्य ठिकाणीच खर्च करणे हे फार महत्त्वाचे आहे. खर्च कसा करावा हे अनेकांना कळत नाही, त्यामुळे अनाठायी खर्च होऊन पैसा त्यांच्याजवळ शिल्लक रहात नाही. कुबेर ही देवता पैसा कसा राखावा हे शिकविणारी आहे असे मानले जाते. म्हणून या पूजेकरता लक्ष्मी व कुबेर या देवतांचे पूजन केले जाते.
सर्वच लोक विशेषत: व्यापारी ही पूजा मोठ्या उत्साहाने व थाटामाटात करतात. धने हा धनवाचक शब्द असल्यामुळे तर लाह्या हे समृद्धीचे प्रतीक असल्यामुळे या पूजेत धने व साळीच्या लाह्या वाहिल्या जातात. थोड्याशा साळी भाजल्या की त्याच्या ओंजळभर लाह्या होतात. लक्ष्मीची समृद्धी असली पाहिजे म्हणून समृद्धीचे प्रतीक असलेल्या लाह्या वहातात.
गुण निर्माण केल्यानंतर दोष नाहीसे झाले पाहिजेत; तरच गुणांना महत्त्व येते. यासाछी लक्ष्मीप्राप्तीचा उपाय म्हणून म्हणून या दिवशी नवीन केरसुणी विकत घेतात. तिला लक्ष्मी म्हणतात. त्या केरसुणीने मध्यरात्री घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकाला जातो. यामुळे (कचरा – दारिद्य्र) नि:सारण होते असे मानले जाते. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे टाळले जाते. फक्त या रात्री कचरा बाहेर फेकला जातो. कचरा काढताना सुप व दिमडी वाजवूनही नकारात्मक शक्तीला हाकलून लावण्यात येते.
रविवारी लक्ष्मीपूजनाचे मुहूर्त-
सकाळी ९.३० ते ११.०० (लाभ)
सकाळी ११.०० ते ११.३० (अमृत)
दुपारी २.०० ते ३.३० (शुभ)
सायंकाळी ६.३० ते ८.०० (शुभ)
रात्री ८.०० ते ९.१५ (अमृत)