भारतात रेल्वेचं सर्वात मोठं जाळं असून जगात चौथ्या आणि आशियात दुसऱ्या क्रमांकावर येते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करत असतात. देशात एकूण ७ हजार ३४९ रेल्वे स्थानकं आहेत. प्रवास करताना आपण डोळ्यासमोर येणाऱ्या स्टेशनची नावं आपण वाचतो. पण कधी असं पाहिलं आहे का? स्टेशनची नावं वेगवेगळ्या रंगात लिहिली आहेत. नाही ना, पिवळ्या रंगाच्या साइनबोर्डवर नाव लिहिल्याचं पाहिलं असेल. रेल्वे साइनबोर्डसाठी कायम पिवळा रंग का वापरते, या मागचं कारण माहिती आहे का?, नसेल तर ही बातमी वाचल्यावर तुम्हाला कळेल.
पिवळ्या रंगाचा थेट संबंध सूर्यप्रकाशासोबत येतो. पिवळा रंग आनंद, ऊर्जा आणि बुद्धीशी निगडीत आहे. पिवळ्या रंगाची पार्श्वभूमी इतर रंगांच्या तुलनेत प्रभावी असते. हा रंग मनावर सकारात्मात प्रभाव टाकतो. तसेच पिवळ्या रंगाच्या पार्श्वभूमीमुळे काळ्या रंगातील शब्द लांबून स्पष्ट दिसतात. त्यामुळे डोळ्यांवर जास्त ताण येत नाही. तसेच मोटरमनला लांबूनच स्टेशन जवळ आल्याचं कळतं आणि ट्रेनचा वेग कमी करण्यास मदत होते. पिवळा रंग हा कमी प्रकाशात तसेच धुकं, मुसळधार पाऊस आणि अंधारात दुरवरून स्पष्ट दिसतो. यामुळे मोटरमन सतर्क राहतो. कधी कधी काही स्थानकांवर ट्रेन थांबवायची नसते, त्यामुळेही फायदा होता. पिवळा बोर्ड बघून लोको पायलट हॉर्न वाजवत राहतो. स्टेशनवरील प्रवासी सतर्क राहतात आणि होणारी दुर्घटना टळते.
पिवळा रंगाचं महत्त्व तुम्हाला शाळेच्या बस पाहिल्यावरही समजेल. ही बस लांबून पाहिल्यावरच शाळेची असल्याचं कळतं. अवजड वाहनं मुखत्वे पिवळा रंगात असतात. जसे जेसीबी, खाणकामासाठी वापरले जाणारे मोठ्या आकाराचे ट्रक, डांबरीकरणासाठी वापरले जाणारे रोलर अशी सार्वजनिक बांधकामासाठीची वाहने पिवळ्या रंगाचीच असतात. वैज्ञानिकांना असे आढळले आहे की पिवळा रंग लाल रंगापेक्षा १.२४ पट जास्त दिसू शकतो.