मोबाईल फोन ही चैनीची गोष्ट राहिली नसून तो आपली गरज बनला आहे. अनेकजण एक मिनिटही या फोनला आपल्यापासून दूर ठेवत नाही. काहीजण तर उशाखाली फोन घेऊन झोपतात. सतत हातात फोन घेऊन व्हॉट्स अॅप, मेसेंजर, फेसबुक, स्नॅपचॅट, इन्स्टाग्रामवर आपण ऑनलाइन असतो. हा फोन काही मिनिंटासाठी जरी बाजूला ठेवला तरी तो सतत व्हायब्रेट होत आहे किंवा तो वाजत आहे असा भास आपल्याला होतो. पण, प्रत्यक्षात मात्र आपला फोन वाजत नसतो. हा भास म्हणजे ‘फँटम व्हायब्रेट सिंड्रोम’ होय.
वाचा : स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी ‘या’ गोष्टी नक्की करा
आपण सतत फोन वापरत असतो. त्यामुळे, या फोनची आपल्याला इतकी सवय होती की तो शेजारी नसला तरी तो वाजत असल्याचा भास आपल्याला होतो. यालाच ‘फँटम व्हायब्रेट सिंड्रोम’ असे म्हणतात. जवळपास सगळ्यांनाच असे भास होतात. फोन व्हायब्रेट होणे किंवा फोनची रिंग वाजतेय असे वाटून सतत तो तपासून पाहणे हे अनेकांच्या बाबतीत होते. जगात जवळपास सगळ्यांकडे मोबाईल फोन आहेत आणि या फोनच्या आहारी गेलेल्या ८० टक्क्यांहूनही अधिक लोकांना असे भास होत असल्याचे एका संशोधनात म्हटले आहे. आपल्या मेंदूला नेहमी फोनचे व्हायब्रेशन किंवा रिंग ऐकण्याची सवय झाली असते, ही सवय इतकी असते की आपला फोन स्विच ऑफ असला तरी डोक्यात हा आवज बसलेला असतो. त्यामुळेच असे भास सतत होत राहतात.
वाचा : जाणून घ्या लॅपटॉपला असणा-या आयताकृती स्लॉटचा उपयोग
एका सर्वेक्षणानुसार १०० पैकी ८० टक्के लोकांना ‘फँटम व्हायब्रेट सिंड्रोम’ असतो. जे फोनचा वापर अधिक करतात किंवा त्याच्या आहारी जास्त गेले आहेत अशांना हे भास होतात. त्यामुळे, फोनचा वापर शक्य असेल तितका कमी करण्याचा सल्ला दिला जातो. सतत फोन व्हायब्रेट होत आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळे, घाबरुन जायचे काहीच कारण नाही. मोबाईल फोनच नाही तर अनेकदा अलार्म वाजत असल्याचा भासही अनेकांना होतो.