गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मादी अस्वल आणि तिच्या पिल्लाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. वारंवार प्रयत्न करूनही अपयश पदरात पडणाऱ्या पिल्लाची आईपर्यंत पोहण्याची धडपड या व्हिडिओतून दिसत होती. बर्फाचा डोंगर पार करून आईपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणारं अस्वलाचं पिल्लू अनेकांना प्रेरणादायी वाटलं. पाहायला मजेशीर, प्रेरणादायी आणि आयुष्याचं सार सांगणाऱ्या या व्हिडिओमाचं सत्य हे तितकंच वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया अनेक प्राणीप्रेमींनी आता वर्तवली आहे.
हा व्हिडिओ चित्रीत करणं म्हणजे एकप्रकारची प्राण्यांची छळवणूकच आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. रशियातील बर्फाळ प्रदेशात चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडिओ कोट्यवधी लोकांनी पाहिला. अस्वलाचं छोटं पिल्लू बर्फाचा डोंगर चढण्याचा असफल प्रयत्न करताना या व्हिडिओतून दिसत आहे. मात्र प्रत्येकवेळी छोट्या पिल्लाला अपयश येतं, पण प्रयत्न करण्याचं तो सोडत नाही. अखेर अथक प्रयत्नानंतर हे पिल्लू आईपर्यंत पोहण्यास यशस्वी होतं मात्र अचानक त्याची बर्फावरची पकड सुटते आणि तो खोल पडतो. पुन्हा स्वत:ला सावरून डोंगर चढण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ दिमित्री केद्रोव यांनी शूट केला. माणसांनी नेहमीच प्रयत्न केला पाहिजे असं दिमित्री म्हटलं आहे.
मात्र या व्हिडिओवर अमेरिकेन इकोलॉजिस्ट जॅकलिन गिल, नॅशनल जिओग्राफी, इदाहो इथल्या विद्यापीठातले वैज्ञानिक मार्क डिटमरसह अनेकांनी आक्षेप घेतला आहे. या पिल्लानं बर्फाचा डोंगर कधीच सर केला असता. मात्र आई आणि पिल्लाभोवती व्हिडिओ चित्रीत करण्यासाठी घोंगावणाऱ्या ड्रोनमुळे ते दोघंही घाबरले. ड्रोनच्या आवाजामुळे पिल्लाचं लक्ष विचलित होत होतं. हा ड्रोन शिकारी पक्षी असल्याचं वाटून ते दोघंही घाबरले असावं असं तिघांचं म्हणणं आहे.
पिल्लू आईपर्यंत पोहचण्यास यशस्वी झाला होता , आईनं त्याला हात देण्याचा प्रयत्नही केला. मात्र ड्रोन अधिक जवळ गेल्यानं मादी अस्वल चवताळली आणि तिनं पंजा बर्फावर आदळला. त्यामुळे ठिसूळ बर्फाच्या चादरीवरून पिल्लू पुन्हा घसरत खाली गेलं. सुदैवानं पिल्लू वाचलं नाहीतर त्याचा जीव गेला असता, असं त्यांचं म्हणणं आहे.
व्हिडिओ किंवा छायाचित्रासाठी अशा प्रकारे प्राण्यांचा जीव धोक्यात घालणं ही एकप्रकारे छळवणूक आहे असं म्हणत जॅकलिन गिलनं आपली नाराजी व्यक्त केली आहे. व्हिडिओ आई आणि तिच्या पिल्लाचा विचार करुन योग्य पद्धतीनं चित्रीत केला असता तर तो खऱ्या अर्थानं प्रेरणादायी ठरला असता असंही मत नेटकऱ्यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे.