सध्या सोशल मीडियावर निवडणूक आयोगाच्या नावाने खोटी माहिती पसरवली जात आहेत. व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणाऱ्या या मेसेजमध्ये तुम्ही मतदान न केल्यास तुमच्या बँक खात्यातून ३५० रुपये कापले जातील, असे लिहिले आहे. त्याचवेळी हे प्रकरण समोर आल्यानंतर दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) यांनी एफआयआर दाखल केला आहे. यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
१ डिसेंबर रोजी दिल्ली निवडणूक आयोगाने याबाबत तक्रार केली होती. मतदान न करणाऱ्या नागरिकाच्या बँक खात्यातून ३५० रुपये कापले जातील, असे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत, असा संदेश सोशल मीडियावर व्हायरल करून खोटी माहिती पसरवली जात असल्याचे सांगण्यात आले, मात्र निवडणूक आयोगाने असा कोणताही संदेश जारी केलेला नाही. ही माहिती खोटी असल्याच यावेळी सांगण्यात आलं आहे.
दिल्ली पोलिसांनी नोंदवला एफआयआर
दिल्ली निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन (IFSO) युनिटने तपास सुरू केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम १७१ जी अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे व्हायरल मेसेज?
फेक न्यूजमध्ये दावा केला जात आहे की २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान न करणाऱ्या मतदारांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोग ३५० रुपये कापून घेईल. त्यामुळे मतदान न करणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच असा दावा केला जात आहे की, जे मतदान करणार नाहीत त्यांची ओळख आधार कार्डद्वारे केली जाईल आणि त्यानंतर त्यांच्या आधार कार्डशी लिंक केलेल्या बँक खात्यातून हे पैसे कापले जातील.
एवढेच नाही तर निवडणूक आयोगाने यापूर्वीच न्यायालयाची मंजुरी घेतल्याचेही सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जे मतदार मतदानासाठी येत नाहीत त्यांच्या तयारीसाठी आयोगाने केलेला खर्च वाया जातो. त्याची भरपाई यावेळी मतदान न करणाऱ्यांकडून केली जाईल. तसेच पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे हा व्हायरल संदेश पूर्णपणे बनावट असल्याचे वर्णन केले गेले आहे.
मात्र निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि अशा दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावर शेअर करू नका, असे लिहिले आहे.