पक्ष्यांची गर्भधारणा आणि त्यांना होणारी पिल्ले ही खरंतर सामान्य वाटणारी घटना. जगात दिवसागणिक हजारो पक्षी अंडी घालत असतील आणि त्यांना पिल्लेही होत असतील. पण जगातील एका पक्ष्याची गर्भधारणा मात्र सध्या विशेष चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे या पक्ष्याकडे एक दोन नव्हे तर ३७ व्यांदा ‘गुड न्यूज’ आहे. आता इतक्यांदा गर्भधारणा होत असताना या पक्ष्याचे वय काय असेल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर या पक्ष्याचे वय आहे ६८ वर्षे. खरंतर या वयातही हा पक्षी पिल्लांना जन्म देत असल्याने ही निश्चितच आश्चर्याची बाब आहे. या पक्ष्याला आतापर्यंत ३६ पिल्ले असून आता त्यातीलही अनेकांना पिल्ले झाली आहेत. त्यामुळे या एका पक्ष्याचेच कुटुंब अतिशय मोठे झाल्याचे पाहायला मिळत आहे.
या पक्ष्याचे नाव आहे व्हीस्डम लेसन अल्ब्राट्रॉस. गर्भधारणा होणारा जगातील वयोवृद्ध पक्षी म्हणून त्याची ओळख आहे. हवाई द्विपसमूहावरील मिडवे अटोल याठीकाणी वास्तव्याला असलेल्या या पक्ष्याला मागील ६ दशकांपासून दरवर्षी गर्भधारणा होते. आताही त्याच्याकडे गुड न्यूज असल्याची बातमी येथील यंत्रणेनी दिली आहे. या पक्ष्याला ग्रभधारणेसाठी साधारण ७ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर काही काळ या पिल्लाला पंख फुटून ते प्रत्यक्ष उडण्यास सक्षम होण्यासाठी लागतात. या पक्ष्यांची संख्या मोठी नसली तरीही त्यांचे वयोमान जास्त असल्याने त्यांच्या अनेक पिढ्या एकावेळी अस्तित्त्वात असतात. मात्र अशाप्रकारे इतक्या वेळा अंडी देणारा आणि वयाच्या वृद्धावस्थेतही पिल्लांना जन्म देणारा हा पक्षी जगातील दुर्मिळ पक्षी आहे असे म्हटले जाते.