Viral Post : १९ सप्टेंबर २०२३ रोजी गणेश चतुर्थी आहे. या दिवशी अनेकांच्या घरांत गणपती बाप्पाचे आगमन होईल. तसेच यादरम्यान विविध मंडळांच्या गणेशमूर्ती येण्यास सुरुवात झाली असून, सगळीकडेच जल्लोष सुरू आहे. ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, अनेक फोटोग्राफर, गणेशभक्त, गणपती बापाच्या आगमनासाठी एकत्र जमतात आणि बाप्पाचे अगदी आनंदात स्वागत करतात. तर यादरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे; जी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
लालबाग हे ‘लालबागचा राजा’ नावाने असलेल्या गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध आहे. अनेक गणेशभक्त ‘लालबागच्या राजा’ची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात. गणपती मंडपात बसल्यावर भक्तिभावाने रांगा लावून अनेक जण ‘लालबागच्या राजा’चे दर्शन घेतात आणि आपल्या मनातील इच्छा, व्यथा मांडतात; तर काही जण देवापुढे नवस बोलताना दिसून येतात. तर आज सोशल मीडियावर असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. प्रसिद्ध व्हिडीओ क्रिएटर व कलाकार अमोल यादवने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यातून गणेशभक्तांसाठी एक खास संदेश देण्यात आला आहे. फोटोत युजर रस्त्याच्या कडेला उभा आहे आणि त्याच्या हातात एक कागदी बोर्ड आहे. त्यावर लिहिण्यात आले आहे की, अच्छा सुनो, दुआ पूरी करनी है? लालबाग, परेल आ जाओ; पूरी हो जाएगी। असा खास संदेश हिंदीमध्ये लिहून, तो बोर्ड घेऊन युजर प्रसिद्ध ब्रिजखाली उभा आहे; जिथून अनेक भव्य गणेशमूर्तींचे आगमन होते.
पोस्ट नक्की बघा :
अच्छा सुनो, दुआ पूरी करनी है? लालबाग, परेल आ जाओ; पूरी हो जाएगी :
प्रसिद्ध व्हिडीओ क्रिएटर आणि कलाकार अमोल यादवने याआधीसुद्धा ट्रेनचा प्रवास, आयपीएल मॅच, पाऊस, दादर स्टेशन या सगळ्या विषयांवर अनेकदा असे खास संदेश लिहून पोस्ट शेअर केल्या आहेत. परंपरा आणि संस्कृती जपणारा लालबाग – परळ परिसर अनेक गणेशभक्तांची पहिली पसंती आहे. म्हणून लाखोंच्या संख्येत अनेक जण इथे दर्शनासाठी येतात आणि आपली इच्छा देवासमोर व्यक्त करताना दिसून येतात. तर आता लवकरच सगळ्या गणेशभक्तांच्या लाडक्या ‘लालबागच्या राजा’चेसुद्धा आगमन होईल यासाठी ही खास पोस्ट या कलाकाराकडून शेअर करण्यात आली आहे; जी अनेक गणेशभक्तांच्या पसंतीस उतरते आहे.
सोशल मीडियावरील ही व्हायरल पोस्ट @mainanmolratan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. ‘लालबाग परळ नाव नाही; ब्रँड आहे’ असे कॅप्शन असलेली ही पोस्ट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण या पोस्टवर ‘गणपती बाप्पा मोरया’, ‘अगदी मनातलं बोललास’, ‘माझी इच्छा तर जन्मत:च पूर्ण झाली; कारण मी परेलला जन्म घेतला’, ‘लालबागच्या गणपतीचं दर्शन नीट व्हावं हीच मागणी आहे आता बाप्पाकडे’ अशा अनेक गणेशभक्तांच्या कमेंट पोस्टखाली तुम्हाला बघायला मिळतील.