१४ वर्षांचा संसार मोडला, नवऱ्याच्या जाचापासून अखेर आपली सुटला झाली असं म्हणत टेक्सासमधल्या किम्सबर्ली नावाच्या महिलेनं आपल्या मित्रपरिवारासाठी जंगी पार्टीचं आयोजन केलं. या पार्टीत महिलेनं चक्क घटस्फोट झाल्याच्या आनंदात आपल्या लग्नाचा ड्रेस त्यात स्फोटकं भरून जाळून टाकला.

लग्नाच्या ड्रेसमध्ये तिनं इतकी स्फोटकं भरली की  स्फोट झाल्यानंतर तब्बल २५ किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. दूरूनही अनेकांना कित्येक वेळ आगीचे आणि धूराचे लोट दिसत होते. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात तिचा घटस्फोट झाला. १४ वर्षांचा संसार मोडला. घटस्फोट झाल्याच्या आनंदात तिनं पार्टीचं आयोजन केलं होतं. मात्र यावेळी लग्नाचा ड्रेस जाळून टाकण्याचा जगावेगळा हट्ट तिनं धरला.

मग काय तिच्या वडिलांनी तिचा हट्ट पुरवला. विशिष्ट स्फोटकं त्यांनी लग्नाच्या ड्रेसमध्ये भरली आणि हा ड्रेस तिनं बंदुकीच्या साहाय्यानं उडवला त्यामुळे स्फोटकांनी पेट घेत मोठा आवाज झाला. माझी बंधनातून मुक्तता झाली याचा आनंद मी अशा प्रकारे साजरा केला अशी प्रतिक्रिया तिनं या प्रसंगावर दिली.