अनेकदा आपण राहतो त्या सोसायटी किंवा इमारतीमध्ये लहान लहान गोष्टींवरून वाद होत असतात. पण उगाच राईचा पर्वत करून फक्त भांडायचं म्हणून काही जण भांडण उकरून काढतात आणि जास्तच राग आला, तर काहीही करायला मागे-पुढे बघत नाहीत. ग्रेटर नोएडामध्ये हाऊसिंग सोसायट्यांमधील रहिवासी आणि सुरक्षा रक्षक (सिक्यूरिटी गार्ड) यांच्यामध्ये हाणामारी झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलदेखील झाले आहेत. सध्या अशीच एक घटना ग्रेटर नोएडा वेस्टमधील एका गृहनिर्माण सोसायटीमध्ये घडली आहे. त्यामध्ये एक संतप्त महिला काचेचा मोठा दरवाजा फोडताना दिसली.
नेमकं काय घडलं?
ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बिसरख पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या भागात असलेल्या निराला इस्टेट सोसायटीमध्ये ही घटना घडल्याचे वृत्त आहे. बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे या महिलेने इमारतीत प्रवेश केला. सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये असे दिसते की, ती महिला मध्यरात्री २ च्या सुमारास इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आली आणि तेव्हा तिला तेथे सुरक्षा रक्षक झोपल्याचे दिसले. ड्युटीवर असताना सुरक्षा रक्षक झोपला असल्याचे पाहून ती महिला संतापली.
सुरक्षा रक्षकाला उठवून, त्याला जाब विचारण्याऐवजी महिलेने मुद्दाम इमारतीच्या प्रवेशद्वारावरील काचेचा मोठा दरवाजा फोडला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही महिला पूर्ण ताकदीने दोन ते तीन वेळा दरवाजा बंद करून उघडताना दिसत आहे आणि त्याचमुळे काचेचा दरवाजा तुटून, त्याचे तुकडे झाल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळतेय. मोठ्या काचेच्या दरवाजाचे तुकडे झाल्याचा आवाज ऐकून सुरक्षा रक्षक हडबडून जागा झाला. त्याच वेळी ती महिला काचेचा दरवाजा तोडून घटनास्थळावरून पळून जात असल्याचे फुटेजमध्ये दिसली.
तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये हीच महिला लिफ्टमधून शिवीगाळ करताना आणि ओरडताना दिसली आहे. तसेच “जर हा माझ्यावर ओरडला, तर याचे मी दात पाडेन”, असेही ती म्हणालीय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @diplomaticjoshi या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
पोलीस कारवाई
पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि व्हायरल झालेल्या व्हिडीओचीही दखल घेतली आहे. या प्रकरणी बिसरख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.