आजच्या काळात पालकांना आपल्या मुलांकडे बघायला वेळ नसतो, आई आणि वडिल दोघंही कामात व्यग्र असतात. अशा वेळी आपल्या मुलांची जबाबदारी बिनधास्त मोलकरणींवर टाकून पालक आपापल्या कामाला निघून जातात, जर या मोलकरणींनी मुलांची काळजी घेतली तर ठिकच. नाहीतर अनेकदा या मोलकरणींकडून लहान मुलांना मारहाण केल्याच्या घटनाही समोर येतात, असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सहा वर्षांच्या मुलीने अन्न सांडलं म्हणून तिच्याकडे लक्ष देण्याकरता ठेवलेल्या मोलकरणीने तिला लाकडाच्या पट्टीने अक्षरश: बेदम मारहाण केली.
ही मुलगी रडत होती, हाता पाया पडून तिला विनवणी करत होती, पण या दगडाचं काळीज असलेल्या मोलकरणीला पाझर फुटला नाही. पुढे कितीतरी वेळ ती या मुलीला पट्टीने मारत आणि शिव्या देत होती आणि ही मुलगी जिवाच्या आकांताने कळवळत होती. हा अडीच मिनिटांचा व्हिडिओ मलेशियामधला असल्याचे समजत आहे. हा व्हिडिओ ज्या व्यक्तीने रेकॉर्ड केला त्यालादेखील ही मोलकरीण धमकी देत असल्याचे ऐकू येत होतं. या व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या मोलकरणीला ताब्यात घेतले आहे.
(खालील व्हिडिओतील दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात)