Viral video: आपल्या वाचण्यात अथवा ऐकण्यात कायम अनेक चोरीच्या घटना येत असतात. काळानुरूप चोरीच्या पद्धती बदलल्या, तसेच चोरीचे नवनवीन हातखंडेदेखील बदलत आहेत. मात्र, सध्या एक धक्कादायक चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. कारण- एक महिला तिच्या आलिशान अशा बीएमडब्ल्यू कारमधून आली आणि चोरी करून पसार झाली. विशेष म्हणजे ज्या बीएमडब्ल्यू कारमधून ही चोरी करण्यात आली, त्या गाडीची किंमत सुमारे ४० लाख रुपये आहे. मात्र, आता प्रश्न उपस्थित होतोय की, या महिलेने नेमकी चोरी कशाची केली? तर याचं उत्तर ऐकून तुम्हाला निश्चित आश्चर्य वाटेल. कारण तिने एका दुकानातील फ्लॉवर पॉटची चोरी केलीय. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, व्हिडीओ पाहून तुम्हालाही यावर काय प्रतिक्रिया द्यावी, असा प्रश्न पडेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ नोएडाच्या पॉश भागातील सेक्टर-१८ येथील असल्याचे सांगितले जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओची ही घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ती महिला बीएमडब्ल्यूमधून अगदी आरामात खाली उतरल्याचे दिसत आहे. त्यानंतर ती फ्लॉवर पॉटच्या दुकानाकडे निघते. प्रथम ती आजूबाजूला कुणी आपल्याला पाहत तर नाही ना याची खात्री करते. नंतर फ्लॉवर पॉटच्या वजनाचा अंदाज घेते. मग ती फ्लॉवर पॉट उचलते आणि गाडीकडे घेऊन जाते. दरम्यान, कारमधील तिचा दुसरा जोडीदार दरवाजा उघडतो आणि महिला फ्लॉवर पॉट कारमध्ये ठेवताना दिसते. अशा प्रकारे सराईतपणे ही महिला चोरी करून पसार होते.
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, जेव्हा जवळच्या लोकांनी महिलेच्या कृतीवर आक्षेप घेतला, तेव्हा तिने सडेतोड उत्तर दिले. प्रत्यक्षात जेव्हा लोकांनी तिला फ्लॉवर पॉट चोरल्याबद्दल विचारले, तेव्हा महिलेने उद्धटपणा दाखवायला सुरुवात केली. महिलेने आतापर्यंत दोन फुलांच्या कुंड्या चोरल्याचा दावा केला जात आहे. त्याच वेळी नोएडा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. वाहन क्रमांकावरून पोलिस आरोपी महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर सोशल मीडिया युजर्स या घटनेवर नाराजी व्यक्त करीत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @isambhava नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “मुली फुलांसाठी वेड्या असतात हे मान्य आहे; पण हे अत्यंत लाजिरवाणं आहे.” तर आणखी एकानं, “अशा श्रीमंतीचा काय उपयोग,” असा सवाल केलाय.