Shocking Video: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातले काही व्हिडीओ पाहून काळजाचा ठोकाच चुकतो. माणूस असंही वागू शकतो यावर विश्वास बसेनासा होतो. पण, अशी अनेक क्रूर लोकं अजूनही जगात आहेत जी स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्याचा जीवदेखील घेऊ शकतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेने आपल्या पाळीव प्राण्याचाच जीव घेतलाय…

अमेरिकेतील एका ५७ वर्षीय महिलेला तिच्या श्वानाला विमानात आणण्याची परवानगी नाकारल्यानंतर विमानतळावरील शौचालयात बुडवून मारल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. द इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली होती, जिथे सुरक्षा तपासणीपूर्वी स्वच्छता कर्मचाऱ्यांना शौचालयात मृत प्राणी आढळला.

अधिकाऱ्यांनी संशयिताची ओळख अ‍ॅलिसन अगाथा लॉरेन्स अशी केली आहे, जी विमानात चढण्याचा प्रयत्न करत होती. परंतु, तिच्या श्वानासाठी आवश्यक कागदपत्रे तिच्याकडे नव्हती. पर्यायी व्यवस्था करण्याऐवजी तिने प्राण्याला शौचालयात बुडवून मारले आणि त्याचे अवशेष कचऱ्याच्या डब्यात टाकल्याचा आरोप आहे. चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील पुराव्यांच्या आधारे अटक वॉरंट जारी केले.

जवळजवळ तीन महिन्यांनंतर, १८ मार्च रोजी लॉरेन्सला प्राण्यांवरील अत्याचाराच्या तिसऱ्या-पदवीच्या गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले. न्यायालयीन नोंदींनुसार तिला ५,००० डॉलर्सच्या जामिनावर सोडण्यात आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @unlimited_ls या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तिला सर्वात वाईट शिक्षा मिळायला हवी.” तर दुसऱ्याने “तिलाही अशीच वागणूक द्या” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “हे खरोखरच भयानक आहे.”

लॉरेन्सच्या शेजाऱ्यांनी दावा केला की, तिच्याकडे एक पांढरा पूडल (dog breed) आहे, परंतु तिच्या बहिणीने या आरोपांबद्दल कोणतीही माहिती असल्याचे नाकारले.

फ्लोरिडाच्या अ‍ॅनिमल राईट्स फाउंडेशनचे कार्यकर्ते ब्रायन विल्सन यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आणि गुन्ह्याची तीव्रता अधोरेखित केली. “एका महिलेने तिच्या पाळीव प्राण्याला विमानात चढता येत नसल्याने बुडवून मारल्याचे ऐकून आम्हाला धक्का बसला, ही पाण्याची बाटली किंवा शॅम्पूची मोठी बाटली नाहीये.”

Story img Loader