सोन्याचे अंडे देणाऱ्या कोंबडीची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. मात्र ब्रिटनमधील एका महिलेला कोंबडीच्या अंड्यातून हिरा मिळाला आहे. तुम्हाला कदाचित कोंबडीच्या अंड्यातून हिरा मिळण्याचा प्रकार खोटा वाटेल. कारण सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आपण फक्त गोष्टीतच ऐकली आहे. किंबहुना कोंबडीने सोन्याचे अंडे देणे, याची कल्पना फक्त गोष्टींमध्येच करता येऊ शकते. मात्र कोंबडीच्या अंड्यातून हिरा मिळाल्याची घटना कल्पना किंवा स्वप्न नसून प्रत्यक्षात ब्रिटनमध्ये घटना घडली आहे.
ब्रिटनमधील एक महिला नेहमीप्रमाणे सकाळी नाश्त्यासाठी अंड उकडून खात होती. नेहमीप्रमाणे अंड खात असताना या महिलेच्या दातात काहीतरी अडकले. पहिल्यांदा या महिलेला दाताखाली छोटासा दगड वगैरे आला असेल, असे वाटले. त्यामुळे महिलेने दाताखाली आलेली वस्तू बाहेर काढली आणि तो चक्क हिरा निघाला. हिरा पाहून महिलेला आश्चर्याचा धक्का बसला.
ब्रिटिश महिलेने अंड्यातून मिळालेला हिरा एका सराफा दुकानात दाखवला. सराफा दुकानातील कर्मचाऱ्याने हिरा पारखून पाहिला आणि त्याची किंमत अतिशय जास्त असल्याचे सांगितले. अंड्यामधून हिरा सापडलेली महिला लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्यामुळे लग्नाआधीच हिरा सापडल्याने ब्रिटिश महिलेला अतिशय आनंद झाला आहे. ही घटना म्हणजे शुभशकून असल्याचे महिलेने म्हटले आहे. अंड्यामध्ये सापडलेल्या हिऱ्याची अंगठी बनवणार असल्याची माहिती ब्रिटिश महिलेने दिली.