तैवानमधील ६४ वर्षांच्या महिलेनं तिच्या डाव्या कानाच्या आतून आवाज येत असल्यानं डॉक्टरांकडे धाव घेतली. चार दिवसांपासून कानातून येणाऱ्या विचित्र आवाजानं तिची रात्रीची झोप उडवली होती. या आवाजांसोबतच कानात हालचालसुद्धा जाणवत होती. जेव्हा ती डॉक्टरांकडे गेली तेव्हा कानात काय आहे ते पाहून त्यांना धक्काच बसला. कानाच्या आत एक कोळी होता आणि त्याच्यासोबत त्यानं स्वत:वरील काढून टाकलेलं कवचदेखील होतं. डॉक्टर व त्यांच्या साथीदारांनी मिळून त्या कोळ्याला व त्याच्या कवचाला कानातून अलगदपणे बाहेर काढलं. या प्रक्रियेत स्वाभाविकत: त्या महिलेच्या कानाला वा कानाच्या पडद्याला इजा होणार नाही ना याची काळजीही त्यांनी घेतली. तैवानमधील टायटन म्युनिसिपल हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या या असामान्य घटनेची नोंद न्यू इंग्लंडच्या मेडिकल जर्नलमध्येसुद्धा करण्यात आली आहे.
या घटनेवर डॉक्टर म्हणाले, “उच्च रक्तदाब असलेली ही महिला आमच्याकडे चार दिवसांपासून कानात विचित्र आवाजासह हालचाल जाणवत असल्याची तक्रार घेऊन आली होती. जेव्हा तिला तपासलं तेव्हा तिच्या डाव्या कानात एक कोळी त्यानं काढून टाकलेल्या त्याच्या कवचासोबत हालचाल करताना दिसत होता.”
हेही वाचा : योग्य प्रकारे वापरल्यास लसूण देखील ठेवेल तुम्हाला तंदरुस्त! आहारतज्ज्ञांनी सांगितलेल्या ‘या’ टिप्स लक्षात ठेवा
टायटन म्युनिसिपल हॉस्पिटलमधील ऑटोलरिंगोलॉजी (कान व स्वरयंत्रावर अभ्यास करणारे) विभागाचे संचालक व सहलेखक डॉक्टर टेंगचिन वाँग (Tengching Wang) सांगतात की, कोळयाचा आकार लहान असल्यानं तो कानाच्या आत जाताना महिलेला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही.
ओहिओ विद्यापीठातील जीवशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक जेरी रोवनेर (Jerry Rovner) यांनी कोळी महिलेच्या कानात का गेला असेल याबद्दल अंदाजात्मक विवेचन केलं आहे. ते म्हणतात, “अनेक शिकारी कोळी, खासकरून असे कोळी जे सावजाला अडकवण्यासाठी जाळी विणत नाहीत, तर ते आपल्या कात टाकण्याच्या वेळी स्वतःच्या रक्षणासाठी जागा शोधतात.”
एप्रिल महिन्यातही अशीच एक घटना घडली होती. तेव्हा महिलेच्या कानात शिटीसारखा आवाज येत असून, तिचा कानही दुखत होता. तपासणीदरम्यान तिथे कोळी असल्याचं दिसलं. सुदैवाने तो कोळी विषारी नव्हता; परंतु तरीही त्या महिलेच्या कानाला किरकोळ इजा झाली होती.